2019च्या निवडणुकीत मोदी-शाह जोडगोळीविरुद्ध 20 पक्ष, सोनिया गांधींची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 07:13 PM2018-03-14T19:13:43+5:302018-03-14T19:18:45+5:30
2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीत मोदी आणि शाहा या जोडगोळीविरोधात 20 पक्ष अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - भाजपाची देशभरात सुरू असलेली घोडदौड रोखण्यासाठी आता विरोधी पक्षांची एकजूट होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या मेजवानीस शरद पवार, शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता विरोधी पक्षांमध्ये एकजूट झाल्यास 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीत मोदी आणि शाहा या जोडगोळीविरोधात 20 पक्ष अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. काल झालेल्या बैठकीला काँग्रेससह 20 पक्षांचा समावेश होता.
विविध गटांत विभागलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांनी काल दिल्लीती निवासस्थानी मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल काँन्फ्रन्सचे ओमर अब्दुल्ला, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी, सपाचे रामगोपाल यादव यांच्यासह प्रादेशिक पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्ष नेत्यांना भोजनासाठी निमंत्रित केले होते.
2019 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांना मजबूतपणे उभं करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. विरोधकांनी एकत्र येत लढल्यास मोदी लाट रोखता येईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. 16, 17 आणि 18 मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो.
तिसरी आघाडीसाठीही प्रयत्न -
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय स्तरावर बिगरभाजप, बिगरकाँग्रेस आघाडी बांधण्याच्या प्रयत्नांना तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी त्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी जवळीक वाढवताना दिसत आहेत. काँग्रेसचे राज्यसभेचे पश्चिम बंगालमधील उमेदवारअभिषेक मनु संघवी यांना ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला असला तरी बंगालमध्ये तृणमूल व काँग्रेस एकत्र आल्यास तिथे भाजपाला विरोधी पक्ष म्हणून विस्ताराची संधी मिळेल, हे ममता बॅनर्जी ओळखून आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपविरोधात काँग्रेसला सरसकट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला नाही. डाव्यांना बंगालमध्ये एकाकी पाडणे हा ममतांचा हेतू आहे. पण भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरणही करायचे आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधात समाजवादी पार्टी व बसपा जवळ येत असतानाच, तेलगू देशमच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तेलगू देशम, शिवसेना, एलजेपी, आरएलएसपी हे मित्रपक्षही भाजपसोबत राजकीय सौदेबाजी करावी की रालोआला सोडचिठ्ठी द्यावी, यासाठी संधीची वाट पहात आहेत.
पण काँग्रेससोबत जाण्याविषयी बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, आप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, जनता दल (सेक्युलर), तेलगू देशम पार्टी व व्हायएसआर काँग्रेस यांच्या भूमिका स्पष्ट नाहीत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स हेच काँग्रेससमवेत आहेत. द्रमुक व अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दलही कधी कुठे जातील, हे सांगणे अवघड आहे.