विधानसभेच्या ६४ जागांसाठी पोटनिवडणुका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 02:12 AM2019-09-22T02:12:59+5:302019-09-22T02:13:11+5:30
नवी दिल्ली : १८ राज्यांतील ६४ विधानसभा मतदारसंघ, तसेच एका लोकसभा मतदारसंघात २१ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात येणार असल्याची ...
नवी दिल्ली : १८ राज्यांतील ६४ विधानसभा मतदारसंघ, तसेच एका लोकसभा मतदारसंघात २१ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. २४ आॅक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, कर्नाटकातील १५ आणि उत्तर प्रदेशातील ११ विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. कर्नाटकात अलीकडेच अपात्र ठरविण्यात आलेल्या आमदारांच्या मतदारसंघांतही पोटनिवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदारसंघांतील आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने तेथे पोटनिवडणुका होत आहेत.
बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. येथील लोकजनशक्तीचे खासदार रामचंद्र पासवान यांचा जुलैमध्ये मृत्यू झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात मात्र २१ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसोबत मतदान होणार नाही, असे अरोरा यांनी सांगितले. येथील खासदार उदयन राजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजीनामा दिला आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकाही टाळण्यात आल्या आहेत. दुर्गापूजा उत्सवामुळे त्या पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आल्याचे अरोरा यांनी सांगितले. पंचायत निवडणुका असल्यामुळे छत्तीसगढमधील पोटनिवडणुकाही टाळण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयात वाद प्रलंबित असल्यामुळे इतर काही ठिकाणी पोटनिवडणुका टाळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असलेल्या राज्यांत अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मध्यप्रदेश, मेघालय, ओडिशा आणि पुदुचेरी (प्रत्येकी एक जागा) तसेच आसाम (४), बिहार (५), गुजरात (४), हिमाचल प्रदेश (२), केरळ (५), पंजाब (४), राजस्थान (२), तामिळनाडू (२) आणि सिक्कीम (३) यांचा समावेश आहे.