गुजरातमध्ये निवडणुका लवकर होणार?
By admin | Published: December 22, 2016 12:57 AM2016-12-22T00:57:14+5:302016-12-22T00:57:14+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर सभेत भ्रष्टाचाराच्या केलेल्या
अहमदाबाद : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर सभेत भ्रष्टाचाराच्या केलेल्या जोरदार आरोपांमुळे गांधींनी मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे सगळ््या देशात चित्र निर्माण झाले असले तरी या जाहीरसभेचा सूक्ष्म तपशील पाहता गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकर होण्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळतात.
गुजरातमधील मेहसानाची निवड जाहीरसभेसाठी राहुल गांधी यांनी करणे, गुजरातेत पाटीदार, दलित, मुस्लिम समाजावरील अत्याचारांचा उल्लेख करणे नरेंद्र मोदी यांच्यावर आधीच केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पुनरुच्चार हा तो सूक्ष्म तपशील आहे. मोदी यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्वत:ची प्रतिमा भ्रष्टाचारापासून मुक्त असलेला राजकीय नेता अशी केली होती व लोकांनाही ती पसंत पडली होती. त्या आधारानेच ते २०१४ मध्ये पंतप्रधान बनले होते.
राजकीय निरीक्षकांचे म्हणणे असे आहे की राहुल गांधी यांनी २०१७ मध्ये गुजरात विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेला या जाहीरसभेने जणू सुरवातच केली आहे. आणि त्यासाठी त्यांनी उत्तर गुजरातमधील मेहसाना हा मोदी यांचा जिल्हा निवडला. गुजरात राज्यात मेहसाना जिल्ह्याचे विशेष राजकीय स्थान आहे म्हणूनच काँग्रेसने त्याची काळजीपूर्वक निवड केली. गुजरातला जर भाजपची प्रयोगशाळा व बालेकिल्ला मानले तर मेहसाना हा भाजपचा राज्यातील मोठा गड आहे. १९८४ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला असताना राज्यात भाजपने जिंकलेल्या अवघ्या दोन जागांमध्ये मेहसानाची एक होती.
तथापि, २०१५ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने मेहसाना जिल्हा व तालुका पंचायत तसेच मेहसाना नगरपालिका निवडणुका जिंकल्या. पाटीदार समाजाने राखीव जागांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू मेहसानाच होते. याच आंदोलनामुळे आनंदीबेन पटेल यांना राजीनामा द्यावा लागून मुख्यमंत्रीपद विजय रुपानी यांच्याकडे आले.
२०१४ मध्ये निवडणुकीनंतर तसेच मोदी सरकारने चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर मेहसानातील बुधवारची राहुल गांधी यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. यासभेपूर्वी राहुल यांनी उन्झा येथील उमिया माता मंदिराला
भेट दिली. पाटीदार समाजात या देवीचे स्थान खूप मोठे आहे. पाटीदार समाजाला काँग्रेससोबत घेण्याचा हा व्युहात्मक भाग आहे. (विशेष प्रतिनिधी)