यूपीमध्ये जानेवारीत होणार निवडणूक
By admin | Published: June 18, 2016 01:33 AM2016-06-18T01:33:46+5:302016-06-18T01:33:46+5:30
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची अधिसूचना काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून, पुढील वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातपर्यंत पाच टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक
- मीना दुबे, लखनौ
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची अधिसूचना काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून, पुढील वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातपर्यंत पाच टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असल्याचे समजते. निवडणुकीची अधिसूचना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निघेल, असे कळते.
सर्वच राजकीय पक्ष निवडणुकाच्या तयारीला लागले असून, विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडू लागल्या आहेत. सध्याच्या विधानसभेची मुदत १५ मार्च २0१७ रोजी संपत आहे. अर्थात विधानसभेची पहिली बैठक ८ मे रोजी झाली होती, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. तरीही १५ मार्चच्या आधी निवडणूक प्रक्रिया संपवणे आयोगाला आवश्यक आहे. आम्ही निवडणुकांच्या कार्यक्रमाची ब्लू प्रिंट केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली आहे, असे राज्य निर्वाचन अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिसूचना १५ ते २0 जानेवारीच्या दरम्यान निघून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात व्हावी आणि १८ फेब्रुवारी ते १0 मार्चच्या दरम्यान पाच टप्प्यांमध्ये मतदान पूर्ण करून निकाल लावावेत, असा आयोगाचा प्रयत्न राहील. मतदारयाद्यांचे काम यावर्षी आॅक्टोबरपर्यंत पूर्ण केले जाईल. हे काम वेळेत पूर्ण करण्यास सर्व जिल्ह्यांना सांगण्यात आले आहे. जूनच्या शेवटच्या वा जुलैच्या पहिल्या आठवड्यात आयोगातर्फे सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावण्यात येईल आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेईल.
राजकीय पक्षांनाही या कार्यक्रमाची कल्पना असून, त्यामुळे राज्यात प्रचाराची राळ उडायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी व काँग्रेसचे नेते जोरात कामाला लागले असून, त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हिंदू व मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्नही सुरू झाले असून, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी खूपच वाढत चालली आहे.
सत्ताधारी समाजवादी पक्षाने विविध योजना जाहीर करणे, योजना व प्रकल्प यांची पायाभरणी,उद्घाटन यांना जोर चढला आहे. लखनौ एक्स्प्रेस, कॅन्सर रुग्णालय व लखनौ मेट्रोचे लोकार्पण आॅक्टोबर व जानेवारीमध्ये केले जाण्याची चिन्हे आहेत. सचिवालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.