रमजान महिन्यात निवडणुका टाळता येणार नाहीत : निवडणूक आयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:31 AM2019-03-12T06:31:03+5:302019-03-12T06:31:23+5:30
ओवैसी यांनीही दिला पाठिंबा
नवी दिल्ली : रमजान महिन्यात येणाऱ्या मतदानाच्या तारखांवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काही मुस्लिम धर्मगुरुंनी त्यावर आक्षेप घेतला असला तरी निवडणुका टाळता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांनी तारखांचे समर्थन करून, याचे राजकारण नको, असे म्हटले आहे.
दोन जूनपासून नवीन सरकारची स्थापना होण्याची गरज आहे. एका महिन्यात निडणुका होतील, असे शक्य नव्हते. संपूर्ण महिना वगळून निवडणूक पुढे ढकलता येणार नाही, त्यामुळे रमजानचा विचार करूनच तारखा ठरवण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे या महिन्यातील सर्व शुक्रवार आणि मुख्य सणाचा दिवस वगळूनच मतदानाच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ओवैसी म्हणाले की, रमजानच्या काळात आपण इतरही कामे करतोच. तसे मुस्लीम रोजा करून मतदानाला जाऊ शकतो. उलट या काळात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात मतदान करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
६ मे पासून रमजानचा महिना सुरु होणार आहे. या महिन्यात निवडणुका घेऊ नये, रमजाननंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देवबंदी उलेमा या मुस्लिम संघटनेने केली आहे. मदरसा जामिया शैखुल हिंदचे आलीम मुफ्ती असद कसमी यांनी निवडणुकींच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. मुस्लिम धर्मगुरु खालिद रशीद फरंगी यांनीही तारखांवर आक्षेत घेतला. त्यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान रमजाननंतर घेण्यात यावे अशी मागणीही केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनीही तारखांबाबत आयोगाने पुर्नविचार करावा, अशी मागणी केली आहे.