राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज गुजरातेत निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 01:46 AM2017-08-08T01:46:58+5:302017-08-08T01:47:13+5:30
गुजरात विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर पाठविण्याच्या तीन जागांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, भाजपातर्फे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी व काँग्रेसमधून बाहेर पडलेले बलवंतसिंह राजपूत हे तिघे निवडणूक लढवत असून, काँग्रेसतर्फे सरचिटणीस अहमद पटेल रिंगणात आहेत.
बंगळुरू/ अहमदाबाद : गुजरात विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर पाठविण्याच्या तीन जागांसाठी उद्या, मंगळवारी मतदान होत असून, त्यामुळे तेथील काँग्रेसच्या ४४ आमदारांना सोमवारी सकाळी बंगळुरूमधून अहमदाबादमध्ये आणण्यात आले. भाजपातर्फे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी व काँग्रेसमधून बाहेर पडलेले बलवंतसिंह राजपूत हे तिघे निवडणूक लढवत असून, काँग्रेसतर्फे सरचिटणीस अहमद पटेल रिंगणात आहेत.
राजपूत यांना तिसºया जागी निवडून आणण्याचे आणि अहमद पटेल यांना पाडण्याचे भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचा भाग म्हणून काँग्रेसच्या ५७ पैकी सहा आमदारांना आधीच राजीनामा दिला. त्यानंतर ५१ पैकी ४४ आमदारांना बंगळुरूला पाठविण्यात आले. उरलेले ७ आमदार कुठे आहेत, हे समजलेले नाहीत. मात्र काँग्रेसच्या आमदारांची मते फोडण्याचा भाजपाचा डाव आहे.
पटेल निवडून येणार नाहीत, काँग्रेसची मते निश्चित फुटतील, असा दावा मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज केला. मात्र काँग्रेसची ४४ व राष्ट्रवादीची दोन मते मिळतील, असे अहमद पटेल यांचे म्हणणे आहे. पण कोणाला मतदान करायचे हा निर्णय आम्ही घेतलेला नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसची सर्व मते अहमद पटेल यांना मिळाल्यास निश्चित निवडून येतील. पण आपली मते फुटणार नाहीत, याची खात्री काँग्रेसलाही दिसत नाही.
निवडून येण्यासाठी ४६ मतांची गरज आहे. विधानसभेत भाजपाचे १२१ आमदार आहेत. प्रत्येक उमदेवाराला ४६ याप्रमाणे भाजपाला १३८ मतांची म्हणजेच १३८ मतांची गरज आहे. मात्र सदस्यांची संख्या ६ ने कमी झाल्याने तिघांना मिळून १३६ मते मिळाली तरी चालू शकेल. त्यासाठी काँग्रेसची काही मते फुटणे व राष्ट्रवादी तसेच अपक्षांची मते मिळणे गरजेचे आहे. राजपूत यांनी भाजपात प्रवेश करताना आपण मते फोडू असे आश्वासन दिले. त्याआधारेच भाजपाने त्यांना उमेदवारी दिली आहे. पण ती फोडता आली नाहीत, तरी भाजपाचे मूळचे दोन उमेदवार निश्चितच निवडून येतील. (वृत्तसंस्था)
विधानसभांवर लक्ष
भाजपाने काँग्रेसला खिळखिळी करण्याचाच डाव आखला आहे. राज्यसभेपेक्षा भाजपाचे लक्ष या वर्षी होणाºया विधानसभा निवडणुकांवर आहे. काँग्रेसचे शंकरसिंह वाघेला यांनी पक्षातून बाहेर पडणे, हा भाजपाच्या रणनीतीचा भाग होता. भाजपा अनेक वर्षे सत्तेत असल्याचा, पटेल आरक्षण आंदोलनाचा आणि व्यापाºयांचा रोषाचा फायदा काँग्रेसला मिळू नये, यासाठीच हे सुरू असल्याचे सांगण्यात येते.