पुन्हा राज्याचा दर्जा मिळेपर्यंत निवडणूक लढणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 04:45 AM2020-07-28T04:45:14+5:302020-07-28T04:45:28+5:30
ओमर अब्दुल्ला यांचे प्रतिपादन : अधिकार नसलेल्या विधानसभेचा सदस्य व्हायचे नाही
श्रीनगर : राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी सडकून टीका केली आणि जोपर्यंत जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जात नाही तोपर्यंत आपण विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले.
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओमर अब्दुल्ला म्हणाले की, निवडणूक न लढविण्याचा माझा निर्णय ही धमकी नाही किंवा ते ‘ब्लॅकमेलिंग’ही नाही. मी नाराजीने असे म्हणतो असेही नाही. ज्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेला काहाही अधिकार नाहीत त्या विधानसभेचा सदस्य होण्याची माझी इच्छा नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ते म्हणाले की, मी एका राज्याच्या विधानसभेचा नेता होतो व ती विधानसभा देशात सर्वात जास्त अधिकारसंपन्न होती. आता असणारी केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा सर्वात अधिकारशून्य विधानसभा असेल. (वृत्तसंस्था)
जनतेसाठी काम करीत राहणार
च्तुम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी त्यावर पक्षात चर्चा केली का, असे विचारता ते म्हणाले की, हे माझे मत आहे व माझा निर्णय आहे. एखाद्याला इच्छा नसताना निवडणूक लढविण्याची बळजबरी कोणीही करू शकत नाही.
च्मात्र, निवडणूक लढविली नाही तर मी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाच्या माध्यमातून काश्मीरच्या जनतेसाठी यापुढेही काम करीत राहीन, असेही काश्मीरचे पूर्वी मुख्यमंत्री व केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले ५० वर्षांचे अब्दुल्ला म्हणाले.
च्ते असेही म्हणाले की, काश्मीरचा राज्याचा दर्जा हिरावून घेताना मोठ-मोठी आश्वासने दिली गेली व नानाविध कारणे दिली गेली; पण त्यापैकी एकाचीही पूर्तता झालेली नाही किंवा त्यापैकी एकही कारण समर्पक असल्याचे दिसून आले नाही.
च्ओमर यांचे वडील व पक्षाचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनीही रविवारी अशाच प्रकारची टीका केली होती व केंद्र सरकारने ‘विश्वासघाता’ने हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करून काश्मिरी जनतेचे मन जिंकावे, असे आवाहन केले होते.