येत्या पाच वर्षांत वाढतील इलेक्ट्रिक वाहने - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 04:23 AM2018-09-10T04:23:15+5:302018-09-10T04:23:40+5:30
देशात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे (ईव्ही) उत्पादन वाढण्यासाठी विस्तृत रूपरेषा तयार करण्यात आली
नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे (ईव्ही) उत्पादन वाढण्यासाठी विस्तृत रूपरेषा तयार करण्यात आली असून, येत्या पाच वर्षांत स्वयंचलित वाहनांच्या संख्येत ही वाहने १५ टक्के असतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
ग्रीन व्हेइकल्सला प्रोत्साहन देणे आणि प्रदूषण रोखण्यासाठी भारताने गंभीरपणे विचार करण्याची ही वेळ आहे, असे गडकरी यांनी म्हटले. इव्ही आणि पर्यायी इंधनासाठी गडकरी सातत्याने आग्रह करीत आहेत. भारतात इलेक्ट्रिक व्हेइकल्सची मोठी मागणी आहे. या वाहनांची संख्या एकूण वाहनांमध्ये येत्या पाच वर्षांत १५ टक्के असावी, अशी आमची अपेक्षा आहे, असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. गडकरी म्हणाले की, कोणतेही आर्थिक प्रोत्साहन न देता इलेक्ट्रिक व्हेइकल्सला उत्तेजन देण्यासाठी माझ्या मंत्रालयाने अगदी तपशीलासह अहवाल तयार केला आहे. या वाहनांना अनुदानाची गरज नाही, हे गडकरी यांनी स्पष्ट केले.