देशात १५ राज्यात विजेची बोंब, भारनियमन ९ ते १५ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:13 AM2022-04-28T11:13:08+5:302022-04-28T11:14:04+5:30
देशातील १५ राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाचे संकट असताना महाराष्ट्रात दिलासादायक स्थिती असल्याचा दावा
मुंबई : देशावरील वीज संकट अधिकच गडद होत आहे. राष्ट्रीय भारप्रेषण केंद्राच्या आकडेवारीनुसार सोमवारी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा आदींसह १० राज्यांमध्ये साधारणत: ९ ते १५ टक्क्यांपर्यंत विजेची तूट आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागले. मंगळवारी विजेची तूट असलेल्या राज्यांची संख्या १० वरून १५ झाली असून, यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, झारखंड, पंजाब, आंध्र प्रदेश, ओरिसा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, केरळ, आसाम, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे.
देशातील १५ राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाचे संकट असताना महाराष्ट्रात दिलासादायक स्थिती आहे. विविध उपाय राबवत पुरेशी वीज उपलब्ध करीत भारनियमन शून्यावर आणण्याची कामगिरी महाराष्ट्राने केली तर वीजसंकट पूर्णत: दूर होईपर्यंत भारनियमन टाळण्याचे प्रयत्न केले जातील, असे महावितरणचे म्हणणे आहे. देशात सर्वाधिक २७,८३४ मेगावॉट विजेचा पुरवठा करताना महाराष्ट्रात मात्र कुठेही भारनियमन करावे लागले नाही, असा दावा महावितरणने केला असून, मुंबई वगळून राज्यात मागणीप्रमाणे केलेल्या २३,७९४ मेगावॉट अखंडित वीजपुरवठ्याचा समावेश आहे.