२०१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज-गोयल
By admin | Published: March 7, 2016 03:02 AM2016-03-07T03:02:46+5:302016-03-07T03:02:46+5:30
२०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे; परंतु त्यापूर्वीच हे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने काम सुरू झालेले आहे
मथुरा : २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे; परंतु त्यापूर्वीच हे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने काम सुरू झालेले आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी दिली. देशात वीज वा कोळशाची टंचाई नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.
‘देशात वीज आणि कोळशाची अजिबात टंचाई नाही. त्यामुळे कोणताही वीज प्रकल्प तात्पुरता बंद केला जाणार नाही. सध्या आम्ही कोणत्याही राज्याला मागणीनुसार वीजपुरवठा करू शकतो,’ असे गोयल म्हणाले. शनिवारी सायंकाळी मथुरा येथे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत गोयल बोलत होते.
२०१८ पर्यंत देशातील सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिज्ञेचा उल्लेख करून गोयल म्हणाले, सर्व गावांत वीज पोहोचविण्याचे हे लक्ष्य २०१७ मध्येच गाठण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आतापर्यंत ६,११४ गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजे आमचे ३८ टक्के काम पूर्ण झाले आहे.
गोयल यांनी एलईडी दिव्यांचा वापर वाढविण्याचे समर्थन केले. एलईडी बल्ब बाजारात ४५० रुपयाला मिळतो; पण आम्ही सामान्य माणसाला तो ७५ रुपयांत विकत आहोत. देशातील प्रत्येक घरात २०१९ पर्यंत एलईडी बल्ब लागावा, हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी ७७ कोटी बल्बची विक्री केली जाईल. त्यामुळे २.५ कोटी युनिट ऊर्जेची बचतही होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी यांचीही भाषणे झाली. (वृत्तसंस्था)