सावधान! दोन दिवस गुल होऊ शकते तुमच्या घरातील वीज; कर्मचाऱ्यांनी केली संपाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 10:54 PM2022-03-23T22:54:30+5:302022-03-23T22:56:43+5:30
देशभरातील कामगार संघटनांच्या आवाहनाला साद देत सर्व राज्यांतील वीज कर्मचारी या 2 दिवसीय देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. येणाऱ्या 28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीजकर्मचारीसंपावर जाणार आहेत. विद्युत कर्मचारी आणि अभियंत्यांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या (NCCOEEE) बुधवारी झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वच राज्यांतील कर्मचारी होणार सहभागी -
देशभरातील कामगार संघटनांच्या आवाहनाला साद देत सर्व राज्यांतील वीज कर्मचारी या 2 दिवसीय देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ हे सर्व कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया पॉवर इंजिनीअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी सांगितले.
अशी आहे कर्मचाऱ्यांची मागणी -
दुबे म्हणाले, वीज (सुधारणा) विधेयक 2021 मागे घेण्यात यावे, सर्व प्रकारची खाजगीकरण प्रक्रिया थांबवण्यात यावी, या वीज कर्मचारी व अभियंत्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. याच बरोबर, केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेषत: नफा कमावणाऱ्या चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दीव आणि पुद्दुचेरीमधील विजेचे खासगीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा आणि वीज मंडळे विसर्जित केल्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व वीज कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनअंतर्गत आणावे.
भरतीच्या मागणीचाही समावेश -
दुबे म्हणाले, याशिवाय राज्यांत सर्व वीज कंपन्यांचे एकीकरण करून केरळच्या केएसईबी लिमिटेड आणि हिमाचल प्रदेशातील एचपीएसईबी लिमिटेडप्रमाणे एसईबी लिमिटेडची स्थापना करावी. तसेच नियमित पदांवर नियमित भरती करण्यात यावी आणि सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तेलंगणा सरकारच्या धर्तीवर नियमित करण्यात यावे, अशीही विद्यूत कर्मचाऱ्यांची मागणी आहे.