Electricity theft: धक्कादायक! देशाच्या 'या' राज्यात गेल्या ५ वर्षात तब्बल ७०० कोटी रूपयांची वीजचोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 07:46 PM2022-09-13T19:46:23+5:302022-09-13T19:47:46+5:30
दंड वसूल करण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Electricity theft: वीजचोरी ही भारतातील एक मोठी समस्या आहे. एखाद्या मोठ्या सण-उत्सवाच्या वेळी अनेक वेळा वीजचोरी केल्याची प्रकरणे उघडकीस येतात. पण हरियाणात मात्र धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हरियाणात (Haryana) गेल्या पाच वर्षांत तब्बल 700.82 कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये सहभागी लोकांकडून 378.33 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगम (DHBVN)चे व्यवस्थापकीय संचालक पीसी मीना यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात गेल्या महिन्यापर्यंत 51.21 कोटी रुपयांची वीजचोरी आणि 31.22 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. व्यवस्थापकीय संचालकांच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक हस्तक्षेप आणि पायरसी डिटेक्शनद्वारे, डिस्कॉम्सने तांत्रिक आणि वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
व्यवस्थापकीय संचालक पीसी मीना यांनी सांगितले की, 2021-22 या आर्थिक वर्षात 156.65 कोटी रुपयांची वीजचोरी आढळून आली असून 78.70 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. डिस्कॉम टीमने 1,81,078 ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली आणि 45,470 लोक वीज चोरी करताना पकडले गेले. या संदर्भात 42,501 एफआयआर नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवस्थापकीय संचालक पीसी मीना यांनी सांगितले, “वीज चोरी हा कायदेशीर गुन्हा आहे आणि ज्या ग्राहकांनी वीजचोरीचा थकित दंड जमा केला नाही, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. वीजचोरीसाठी दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. DHBVN ने एक पोर्टल सुरू केले आहे आणि माहिती देणाऱ्यांना इनाम दिले जात आहेत. वीजचोरीची माहिती कुणाला मिळाल्यास १८००१८०१०११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून वीजचोरी रोखण्यासाठी हातभार लावता येईल. त्यामुळे शक्य तितका दंड वसूल करण्यावर आमचा भर आहे."