पोलिसांनी मध्यरात्री दुचाकी रोखली; त्यानं ओळख दाखवण्यासाठी थेट परिसराची वीजच कापली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 12:35 PM2020-08-21T12:35:35+5:302020-08-21T12:42:50+5:30
आपण वीज विभागाचे कर्मचारी असल्याची ओळख पटवून देण्यासाठी परिसरातील वीज पुरवठा खंडित
वाराणसी: उत्तर प्रदेशातील वाराणसीत पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना एक अजब घटना घडली. सध्या या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वाहनांच्या तपासणीदरम्यान झालेला प्रकार पाहून वाराणसीचे एसएसपी आणि इतर पोलीस कर्मचारीदेखील हैराण झाले. वाराणसीचे एसएसपी अमित पाठक रात्रीच्या सुमारास वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एक अजब प्रसंग घडला.
पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करत असताना तिथे संजय सिंह नावाची एक व्यक्ती दुचाकीवरून पोहोचली. त्यावेळी मध्यरात्रीचे २ वाजले होते. पोलिसांनी त्यांना थांबवलं. त्यांची चौकशी केली. आपण वीज विभागात काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितलं. मात्र त्यांना ओळखपत्र दाखवता आलं नाही. ओळखपत्र घरी आहे. पण मी वीज विभागाचा कर्मचारी असल्याचं सिद्ध करून दाखवू शकतो, असं संजय सिंह म्हणाले. त्यावरून त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला.
पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद झाल्यानं एसएसपी अमित पाठक यांनी संजय सिंह यांची चौकशी केली. पाठक यांनी त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितलं. त्यावरून संजय सिंह भडकले. मी आत्ता तुम्हा सगळ्यांना माझी ओळख सिद्ध करून दाखवतो, असं सिंह म्हणाले. त्यामुळे तिथे उपस्थित सगळेच हैराण झाले. यानंतर संजय सिंह यांनी करौंदी उपकेंद्राला फोन केला. त्यानंतर रात्री २ वाजून १३ मिनिटांनी संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. हा प्रकार एसएसपींसह सगळेच पोलीस कर्मचारी स्तब्ध झाले. त्यानंतर ४ मिनिटांनी म्हणजेच २ वाजून १७ मिनिटांनी परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत झाला.
यानंतर एसएसपी अमित पाठक यांनी पूर्वांचल विद्युत वितरणचे व्यवस्थापकीय संचालकांकडे संजय सिंह यांची तक्रार केली. व्यवस्थापकीय संचालकांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यात संजय सिंह यांनी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर करौंदी उपकेंद्रात कार्यरत असलेल्या रामलखन यांनी वीज पुरवठा खंडित केल्याचं समोर आलं. त्यांनी याची कोणतीही नोंद लॉगबुकमध्ये ठेवली नव्हती. त्यामुळे संजय सिंह आणि रामलखन यांना निलंबित करण्यात आलं.