हत्तींचे नंदनवन ओडिशा बनला मृत्यूचा सापळा; हस्तिदंतासाठी वाढती शिकार; दशकभरात ७९७ हत्तींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 05:54 AM2022-12-15T05:54:33+5:302022-12-15T05:54:58+5:30
ओडिशामध्ये हस्तिदंतासाठी हत्तींना विजेच्या जिवंत तारेचा शॉक देऊन अथवा विष खाऊ घालून त्यांची शिकार करण्यात येते.
- अंबिकाप्रसाद कानुनगो
लोकमत न्यूज नेटवर्क
भुवनेश्वर : हत्तींचे नंदनवन म्हणून एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या ओडिशामध्ये हस्तिदंतासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जात आहे. पूर्व भारतातील ७४ टक्के हत्ती एकट्या ओडिशामध्ये होते; पण आता हे प्रमाण ३० टक्क्यांवर आले आहे. ओडिशामध्ये गेल्या दशकभराच्या कालावधीत ७९७ हत्तींचा मृत्यू झाला आहे.
ओडिशामध्ये हस्तिदंतासाठी हत्तींना विजेच्या जिवंत तारेचा शॉक देऊन अथवा विष खाऊ घालून त्यांची शिकार करण्यात येते. त्या राज्याच्या वनखात्याने दिलेल्या माहितीनुसार शिकारी जंगलामध्ये विजेच्या जिवंत तारांचे जाळे विणतात. त्यात अडकलेले हत्ती विजेचा जोरदार धक्का लागून मरण पावतात. अशा रीतीने ४० हत्तींचा मृत्यू झाला आहे. रेल्वे किंवा रस्त्यावर वाहनांनी धडक दिल्याने आणखी ४० हत्ती मरण पावले. ३६९ हत्ती विहिरीत पडून, नैसर्गिक किंवा अन्य कारणांमुळे मरण पावले, तर १७० हत्तींचा मृत्यू अज्ञात कारणांनी झाल्याचे वन खात्याने सांगितले. दरवर्षी ओडिशामध्ये सुमारे १८ ते २० हत्ती मरण पावतात.
गेल्या गुरुवारी सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात बकुआ गावाजवळ ८ डिसेंबर रोजी हत्तीची शिकार करण्यात आली. मात्र, या हत्तीचे अवशेष तीन वनाधिकाऱ्यांनी जाळून टाकल्याचा किंवा नदीत फेकून दिल्याचा आरोप झाला होता. त्या प्रकरणाची ओडिशा उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली.
हत्तींची शिकार रोखण्यात ओडिशा सरकार अपयशी ठरले आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले
हत्तींचे अधिवास होताहेत नष्ट
ओडिशामध्ये वाढते शहरीकरण, खाणकाम, औद्योगिकीकरणामुळे वृक्षतोड होत असून, जंगलांचा आकार आक्रसला आहे व हत्तींचे अधिवास नष्ट होत चालले आहेत.