पात्र गटातील मुलांचे लवकरात लवकर होणार लसीकरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 07:02 AM2022-04-28T07:02:56+5:302022-04-28T07:03:17+5:30
देशातील कोरोना स्थितीचा पंतप्रधानांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला व त्यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
नवी दिल्ली : कोरोना साथ अजून संपलेली नाही. गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रतिबंधक उपायांचे यापुढेही पालन करीत राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पात्र गटातील मुलांना प्राधान्याने व लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
देशातील कोरोना स्थितीचा पंतप्रधानांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला व त्यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले की, पात्र गटातील सर्व मुलांनी कोरोना लस घ्यावी यासाठी शाळातून जागृती मोहीम हाती घ्यायला हवी. या संवादाप्रसंगी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी जगातील कोणत्या देशामध्ये तसेच भारतातील कोणत्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, याची सविस्तर माहिती सर्व मुख्यमंत्र्यांना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना साथीशी मुकाबला करण्यात सर्व राज्यांनी उत्तम सहकार्य केले आहे. त्यासाठी मोदी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, सरकारी अधिकारी, कोरोना योद्धा यांचे अभिनंदन केले. कोरोना साथीचे आव्हान अजून संपुष्टात आलेले नाही. ओमायक्रॉन व त्या विषाणूचे उपप्रकार खूप अडचणी निर्माण करू शकतात, हे युरोपमधील देशांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे अनेक देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. भारतातही काही राज्यांमध्येही ही स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
लस ही मोठी संरक्षक ढाल
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ओमायक्रॉनच्या लाटेचा देशाने नीट मुकाबला केला. ९६ देशातील लोकांना प्रौढांपैकी लसीचा किमान एक डोस दिला आहे. १५ वर्षे वयावरील ८४ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी लस ही मोठी संरक्षक ढाल आहे.