१५ पाक रेंजर्सचा खात्मा
By Admin | Published: October 29, 2016 04:46 AM2016-10-29T04:46:50+5:302016-10-29T04:46:50+5:30
पाकिस्तानी फौजांकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत होत असलेल्या हल्ल्याला तडाखेबाज उत्तर देत भारतीय सीमा सुरक्षा दलाने १५ पाकिस्तानी रेंसर्जचा खात्मा
जम्मू : पाकिस्तानी फौजांकडून आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगत होत असलेल्या हल्ल्याला तडाखेबाज उत्तर देत भारतीय सीमा सुरक्षा दलाने १५ पाकिस्तानी रेंसर्जचा खात्मा केला. पाकच्या काही चौक्याही उद्ध्वस्त केल्या. सीमेपलीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके पाहता पाकिस्तानी लष्कर या रेंजर्सना मदत करीत आहे, असा दावा बीएसएफने केला.
सीमेपलीकडून पाकिस्तानच्या निमलष्करी सैनिकांनी जम्मूतील नियंत्रण रेषेलगतच्या भागात केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यासोबत केलेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार, तर अन्य दोन जखमी झाले. गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफांसोबत गोळीबार करीत आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच जम्मू, कथुआ, पूंछ व राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांसोबत नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. गेल्या २४ तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे १0 हून अधिक वेळा उल्लंघन केले.
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल हल्ला केल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात लष्करासोबत सीमा सुरक्षा दल तसेच निमलष्करी दलासोबत प्रांतीय सुरक्षा दलांना सतर्क करीत पाकच्या कुरापतींना तोडीस तोड उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. (वृत्तसंस्था)
जशास तसे उत्तर, पाकच्या काही चौक्या उद्ध्वस्त...
- पाकिस्तानच्या बाजूने होणाऱ्या हल्ल्याला सीमा सुरक्षा दलाकडूनही ‘जशास तसे’ उत्तर दिले जात आहे. सीमा सुरक्षा दलाने केलेल्या उलट हल्ल्यात १५ पाक रेंजर्स ठार झाले असून, त्यांच्या काही चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत, असे सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महांसचालक अरुण कुमार यांनी सांगितले.
- सीमेपलीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात
आलेले उखळी तोफगोळे (८० एमए आणि १२० एमएम) तसेच अन्य स्फोटकांनुसार पाकिस्तानी लष्कराची रेंजर्सला मदत असल्याचे उघड होते, असा दावाही त्यांनी केला.
पलानवाला, मेंढरमध्ये
दोन भारतीय नागरिक ठार
पाकच्या तोफमाऱ्यात पलानवाल भागातील खौर पट्ट्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर आर. एस. पुरा भागात एक जखमी झाला. तसेच पूंछ जिल्ह्यातील मेंढर तालुक्यातील गोहलाद गावातील एक महिला ठार, तर अन्य एक जण जखमी झाल्याचे पोलीस आणि संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.
खडा पहारा देत घुसखोरी उधळली
भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस खडा पहारा देत घुसखोरी उधळून लावण्यासोबत शस्त्रांनी चोख उत्तर देत आहेत. सीमा सुरक्षा दलाने गेल्या आठ दिवसांत कणखर पलटवार करून पाकिस्तानच्या १५ रेंजर्सचा खात्मा केला.
गुरुवारी सायंकाळपासूनच पाकिस्तानी रेंजर्सनी
जम्मू विभागातील कथुआमध्ये उखळी तोफा डागत गोळीबार सुरू केला. नंतर हिरानगर आणि सांबा भागालाही त्यांंनी लक्ष्य केले. शुक्रवारी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या २४ चौक्यांना लक्ष्य केले.
३५ चौक्यांना केले लक्ष्य : गुरुवारी पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या ३५ चौक्यांना लक्ष्य केले होते.
म्हणे, एकही जवान मेला नाही : १५ पाकिस्तानी रेंजर्सचा खात्मा झाला तरी, त्याचे पडसाद देशात उमटू नयेत, म्हणून पाकिस्तानने आमचा एकही सैनिक भारतीय गोळीबारात मरण पावला नाही, असा दावा केला आहे.
दहशतवाद्यांची रानटी वृत्ती; शहीद जवानाचे अवयव कापले
कुपवाडा जिल्ह्यात मकहिल भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी रोखताना शहीद झालेल्या भारतीय जवानाचे अवयव कापून रानटी वृत्तीचे दहशतवादी पळून गेले. या घटनेला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही सैन्य विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पळून जाणाऱ्या दशतवाद्यांपैकी एक जण ठार झाला.