इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकच्या मदतीने ड्रग्स तस्कर भारतात आले; पोलिसांनी सुरू केला तपास...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 09:42 PM2024-12-03T21:42:24+5:302024-12-03T21:44:30+5:30
स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरू झालेली नसताना, ड्रग्स तस्करांनी याचा वापर कसा केला?
Elon Musk : उद्योगपती इलॉन मस्क गेल्या काही काळापासून भारतात आफली स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, अद्याप त्यांना सरकारकडून ग्रीन सिग्लन मिळालेला नाही. पण, आता एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतात लॉन्च होण्यापूर्वीच स्टारलिंक सेवा भारताच्या समुद्रात अडकली असून, अंदमान आणि निकोबार पोलिसांकडे त्याच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंदमान निकोबार पोलिसांनी अलीकडेच काही तस्करांना अटक केली, ज्यांच्याकडून US$ 4.25 अब्ज किमतीचे मेथ ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तस्करांच्या चौकशीत इलॉन मस्कची सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी स्टारलिंक चर्चेत आली. इलॉन मस्क यांनी आपल्या कंपनीची सेवा भारतात सुरू करण्यापूर्वीच, भारताच्या सागरी हद्दीत तस्करांनी कंपनीच्या इंटरनेटचा वापर कसा केला? याचा तपास केला जातोय.
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी पकडलेले तस्कर म्यानमारचे असून, स्टारलिंक इंटरनेटच्या मदतीने भारतीय सीमेत पोहोचल्याचे चौकशीत सांगितले. आता पोलिसांनी इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. इलॉन मस्क यांनी अद्याप भारतात आपली सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू केलेली नाही. अशा परिस्थितीत, त्यांची सॅटेलाइट सेवा भारतीय सागरी सीमेपर्यंत कशी पोहोचली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.