आपमध्ये 'राडा', यादव, भूषण यांची हकालपट्टी
By admin | Published: March 28, 2015 12:48 PM2015-03-28T12:48:37+5:302015-03-28T13:11:07+5:30
योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली असून आपल्याला लाथा- बुक्क्यांनी मारहाण झाल्याचा आरोप यादव यांनी केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज युद्धभूमीचे स्वरूप आले होते. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यासह चार जणांची 'आप' राष्ट्रीय कार्यकारीणीतून हकालपट्टी करण्यात आली असून बैठकीत आपल्याला व कार्यकर्त्यांना लाथा- बुक्क्यांनी तुडवून मारहाण करण्यात आल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. तर आजच्या बैठकीत 'लोकशाहीची हत्या झाली' असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला.
शनिवारी पार पडलेल्या बैठकीची सुरूवातच वादळी झाली. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे बैठकीत आगमन झाले खरे, मात्र योगेंद्र यादव आणि पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना बैठकीसाठी आत प्रवेशच दिला गेला नाही. यामुळे नाराज झालेले यादव हे धरणे आंदोलनास बसले, अखेर थोड्या वेळाने त्यांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली. बैठकत केजरीवाल यांनी सुमारे ४० मिनिटे भाषण केले आणि ते निघून गेले. त्यानंतर मनिष सिसोदिया यांनी प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्रा. आनंद कुमार आणि अजित झा या चौघांना बाहेर काढण्याचा प्रस्ताव मांडला. तो पास होताच या चौघांचीही पक्षाच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली. मात्र यावेळी आपण आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला असता आपली कुठलीच गोष्ट ऐकून घेतली गेली नाही, असे यादव यांनी सांगितले. ही लोकशाहीची हत्या असल्याचेही ते म्हणाले. तर आपल्याला व कार्यकर्त्यांनातेथे उपस्थित असलेल्या बाऊन्सर्सनी मारहाण केली आणि बाहेर काढले, असा आरोप भूषण यांनी केला
दिल्लीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षात नंतरच्या जेमतेम महिनाभरातच गृहयुद्धाचा भडका उडाला असून आजच्या या घटनेमुळे पक्षाच्या अब्रूची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगली गेली आहेत. या सर्व प्रकारामुळे 'आप'चे कार्यकर्ते आणि ज्या जनतेने एवढ्या विश्वासाने पक्षाला निवडणुकीत पुन्हा निवडून दिले त्या सर्वांच्या पक्षावरील विश्वासाला तडा गेला आहे.