मणिपूर मुद्द्यावरून राजकारण लाजिरवाणे; अमित शाह यांचा विरोधकांवर प्रतिहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:43 AM2023-08-10T06:43:25+5:302023-08-10T06:43:56+5:30
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत राजकारण करणे ही अतिशय दुर्दैवी व लाजिरवाणी गोष्ट आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर केला. ते म्हणाले की, ५८ निवारा वस्त्यांना सरकार जंगल ग्राम म्हणून घोषित करणार असल्याची २९ एप्रिल रोजी अफवा पसरली. त्यानंतर मणिपूरमध्ये असंतोष निर्माण झाला.
शाह यांनी सांगितले की, मैतेई समुदाय हा आदिवासी समाज असल्याचा निकाल मणिपूर उच्च न्यायालयाने दिल्याने असंतोष आणखी वाढला. ३ मेपासून मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या. त्या राज्याचे डीजीपी, मुख्य सचिव बदलले, हवाई दलाच्या विमानाने त्या राज्यात ३५ हजार सैनिक पाठविण्यात आले होते.स्वत:ची सरकारे वाचविण्यासाठी भ्रष्टाचारात गुंतल्यानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला, असा आरोप शाह यांनी केला.
मोदी सरकारवर जनतेचा विश्वास
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे. यूपीएचे हे खरे चारित्र्य आहे. मोदी सरकारवर विरोधी पक्षांचा नसेल; पण जनतेचा विश्वास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील जनतेने खऱ्या अर्थाने ज्या नेत्यावर विश्वास दर्शविला ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळेच संपूर्ण बहुमताने मोदी सरकार सलग दोनदा केंद्रात सत्तेवर आले. सुमारे ३० वर्षांनंतर संपूर्ण बहुमत असलेले सरकार अस्तित्वात आले.