आणीबाणीने दिला नव्या राजकारणाला जन्म -मोदी
By admin | Published: October 11, 2015 11:42 PM2015-10-11T23:42:10+5:302015-10-11T23:42:10+5:30
आणीबाणी हा लोकशाहीला सर्वात मोठा हादरा होता. लोकशाहीची चौकट आणि मूल्ये आणखी मजबूत करण्यासाठी एक धडा म्हणून आणीबाणीच्या स्मृती जिवंत ठेवल्या जाव्यात.
नवी दिल्ली : आणीबाणी हा लोकशाहीला सर्वात मोठा हादरा होता. लोकशाहीची चौकट आणि मूल्ये आणखी मजबूत करण्यासाठी एक धडा म्हणून आणीबाणीच्या स्मृती जिवंत ठेवल्या जाव्यात. त्या काळातील संघर्षाने नव्या पिढीच्या नेत्यांना नव्या राजकारणाला जन्म दिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले.
आणीबाणीच्या रूपात देशासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाने देशाच्या लोकशाहीला हादरा दिला. मात्र, त्याचवेळी ती अधिक सशक्त बनून समोर आली. आणीबाणीच्या विरोधात ज्यांनी संघर्ष केला, जे लढले त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणीबाणीच्या काळात जी ओरड झाली त्याबद्दल नव्हे, तर लोकशाहीची मूल्ये आणि चौकट अधिक बळकट झाल्याबद्दल तिचे स्मरण करायला हवे, असे ते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकतंत्र प्रहरी अभिनंदन’ या कार्यक्रमात म्हणाले.
लोकनायक जयप्रकाश यांना आदरांजली अर्पण करतानाच त्यांनी १९७५-७६ मध्ये आणीबाणीच्या काळात कारावास भोगणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कारही केला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंग बादल यांचा त्यात समावेश होता. तत्पूर्वी मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व रालोआचे माजी समन्वयक जॉर्ज फर्नांडिस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. जेपींच्या चळवळीने देशात नवनिर्माणाचे वारे वाहू लागले. दडपशाही झुगारण्याचा सर्वात मोठा संदेश आणीबाणीच्या संघर्षाने दिला. अनेकांनी राजकारणातील प्रारंभीचे दिवस आणीबाणीविरुद्ध लढण्यात घालवले. नव्या राजकारणाचा जन्म झाला, असेही मोदी म्हणाले.
---------------
1 मोदींनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सोबत आणीबाणीच्या काळात अनेकांनी खांद्याला खांदा भिडवून काम केल्याचे स्मरण करवून दिले.
2 पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना भारताचे नेल्सन मंडेला संबोधताना त्यांच्या आणीबाणीतील कार्याचा गौरव केला. बादल यांनी अनेक वर्षे कारागृहात आणि राजकारणात घालविली आहेत, असे ते म्हणाले.
3 मोदींनी आणीबाणीत मुख्य भूमिका बजाविणारे कल्याणसिंग, ओ.पी. कोहली, बलरामदास टंडन, वालूभाई वाला या चार राज्यपालांचाही सत्कार केला.
4 माजी उपसभापती कारिया मुंडा, भाजपचे नेते व्ही.के. मल्होत्रा, जयवंतीबेन मेहता, सुब्रमण्यम स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी.पी. त्रिपाठी, कामेश्वर पासवान, आरीफ बेग यांचाही सत्कारमूर्र्तींमध्ये समावेश होता.