पक्ष्याची धडक बसल्यामुळे ‘इमर्जन्सी लँडींग’
By admin | Published: March 10, 2016 02:43 AM2016-03-10T02:43:45+5:302016-03-10T02:43:45+5:30
भोपाळच्या राजा भोज विमानतळावर मुंबईकडे एअर इंडियाचे विमान झेपावल्यानंतर पाच मिनिटांनी विमानाला एका पक्ष्याने धडक दिल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले
भोपाळ : भोपाळच्या राजा भोज विमानतळावर मुंबईकडे एअर इंडियाचे विमान झेपावल्यानंतर पाच मिनिटांनी विमानाला एका पक्ष्याने धडक दिल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली असून विमानातील ९० प्रवासी सुखरूप आहेत.
एअर इंडियाचे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडचे विपणन व्यवस्थापक विश्रत आचार्य यांनी सांगितले की, ‘एअर इंडियाचे विमान आपत्कालीन स्थितीत भोपाळच्या राजा भोज विमानतळावर उतरविण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांनी सांगितले की, एअर इंडियाचे विमान ए आय ६४५ आज सकाळी ७.५५ वाजता भोपाळच्या राजा भोज विमानतळावरून मुंबईकडे झेपावले.
पाच मिनिटानंतर एका पक्ष्याने विमानाला धडक दिली. यामुळे मृत पक्ष्याचे शरीर विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये घुसल्याने उजव्या बाजूच्या पंख्याचे नुकसान झाले. आचार्य यांनी सांगितले की, विमानाच्या पायलटने त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच हे विमान भोपाळच्या राजा भोज विमानतळावर सुरक्षितरीत्या लँडींग करण्यात आले. (वृत्तसंस्था)