‘जेट’च्या विमानाचे ‘अपुऱ्या इंधना’सह इमर्जन्सी लँडिंग, १५० जणांचा जीव वाचला

By admin | Published: August 22, 2015 01:32 AM2015-08-22T01:32:54+5:302015-08-22T01:32:54+5:30

जवळपास रिकाम्या होत असलेल्या इंधन टाकीसह दोहाहून कोचीकडे येत असलेल्या जेट एअरवेजच्या एका प्रवासी विमानाचे थिरुवनंतपुरम् विमानतळावर

Emergency landing with jet fuel aircraft 'indispensable fuel', 150 lives saved | ‘जेट’च्या विमानाचे ‘अपुऱ्या इंधना’सह इमर्जन्सी लँडिंग, १५० जणांचा जीव वाचला

‘जेट’च्या विमानाचे ‘अपुऱ्या इंधना’सह इमर्जन्सी लँडिंग, १५० जणांचा जीव वाचला

Next

नवी दिल्ली : जवळपास रिकाम्या होत असलेल्या इंधन टाकीसह दोहाहून कोचीकडे येत असलेल्या जेट एअरवेजच्या एका प्रवासी विमानाचे थिरुवनंतपुरम् विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या विमानात १४२ प्रवासी आणि ८ कर्मचारी होते. अपुऱ्या इंधनासह उड्डाण करणे अतिशय ‘गंभीर’ बाब असल्याचे नमूद करून नागरी उड्डयण महासंचालनालयाने (डीजीसीए) या विमानाच्या दोन्ही वैमानिकांना तडकाफडकी निलंबित केले. वेळीच इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला नसता, तर प्रवासी आणि कर्मचारी मिळून तब्बल दीडशे जणांच्या जिवाशी खेळ झाला असता.
कोची आणि थिरुवनंतपुरम् विमानतळावर सहा घिरट्या

मारल्यानंतर जेटच्या ७३७-८०० विमानातील इंधन ‘रिझर्व्ह’वर आले होते. पर्यायी इंधनासह विमानात १५०० किलो इंधन असणे बंधनकारक आहे. परंतु विमान थिरुवनंतपुरम विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले त्यावेळी विमानात केवळ २७० किलो इंधन शिल्लक होते, अशी माहिती डीजीसीएच्या सूत्रांनी दिली. हे विमान आणखी दहा मिनिटे उडत राहिले असते तर हे इंधनही संपले असते, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.
१८ आॅगस्ट रोजी घडलेली ही घटना अतिशय गंभीर आहे, असे नमूद करून डीजीसीएने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश नागरी उड्डयण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विमान अपघात तपास विभागाला दिले आहेत.
या घटनेनंतर, खर्च कपात करण्यासाठी विमान कंपन्या कमी राखीव इंधन साठा ठेवतात की काय याचा तपास करण्यासाठी डीजीसीएने आता इंधन धोरणाची समीक्षा करण्याचे ठरविले आहे. दोहाहून आलेले हे विमान ठरल्याप्रमाणे कोची विमानतळावर उतरणार होते. परंतु खराब हवामानामुळे तीनदा प्रयत्न करूनही ते कोची विमानतळावर उतरू शकले नाही. त्यानंतर वैमानिकाने ‘फ्युएल इमर्जन्सी’चे (इंधनाची कमतरता) कारण देत विमान त्रिवेंद्रमकडे वळविण्याची परवानगी मागितली. वास्तविक विहित पर्यायी विमानतळ बेंगळूरु असतानाही वैमानिकाने त्रिवेंद्रमकडे जाण्याचे ठरविले. तेथेही हवामान खराब असल्याने चार वेळा प्रयत्न केल्यानंतरच विमान उतरविता आले.
———-
डीजीसीएच्या इंधन धोरणानुसार, कोणत्याही विमानात टॅक्सी इंटन, ट्रीप इंधन, आपातकालीन इंधन (ट्रीप इंधनाच्या ५ टक्के), पर्यायी इंधन आणि विमान ३० मिनिटे उड्डाण करू शकेल एवढे नेहमीचे इंधन ठेवणे बंधनकारक आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

————
जेटचे प्रवक्ते म्हणतात...
कोची येथील रन-वेवरील दृष्यात्मकता (व्हीजिब्लिटी) कमी असल्याने जेट एअरवेजचे दोहा येथून कोचीसाठी आलेले ‘९-डब्ल्यू ५५५’ हे विमान तिरुवंनंतपुरम येथे वळविण्यात आले. सुरक्षेला आम्ही कायमच प्राधान्य देतो. त्यात कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाही. या प्रकरणी नागरी हवाई उड्डाण महासंचालकांतर्फे (डिजीसीए) आणि विमान सुरक्षा पथकातर्फे चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी यापेक्षा जास्त प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही.

Web Title: Emergency landing with jet fuel aircraft 'indispensable fuel', 150 lives saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.