‘आणीबाणी’ आणणार मोदी-अडवाणींना एकत्र
By Admin | Published: October 10, 2015 05:24 AM2015-10-10T05:24:40+5:302015-10-10T05:24:40+5:30
येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर दिसतील. निमित्त आहे दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी एकाच व्यासपीठावर दिसतील. निमित्त आहे दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित ‘लोकतंत्र रक्षा दिवस’ कार्यक्रमाचे. रा. स्व. संघाचा प्रभाव असलेल्या या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात कारागृहात गेलेल्यांचा सत्कार केला जाणार आहे.
मोदी आणि अडवाणी यांच्यातील कथित सामंजस्य करार त्यांना एकत्र आणणार असेच संकेत मिळाले आहेत. दीर्घकाळापासून या दोन नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येणेच नव्हे तर एकाच कार्यक्रमात भाषणही टाळले आहे. अडवाणींनी अलीकडे पक्षाच्या कार्यक्रमात मोदींसोबत व्यासपीठावर हजेरी लावली मात्र त्यांना बोलण्याची संधी दिली गेलेली नाही. वयाच्या ज्येष्ठतेनुसार अडवाणींना व्यासपीठावर सोबत करता आली तरी बोलण्याची मुभा दिली जाऊ नये याची दक्षता मोदींनी घेतली आहे. दोघांत क्वचितच सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. अडवाणींनी संधी मिळताच मोदींवर शरसंधान करण्याचीच भाषा वापरलेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी मे मध्ये सत्तेवर आल्यानंतर मोदींनी अडवाणींना पूर्णपणे बाजूला सारले.
लोकनायक जयप्रकाश नारायण जयंती समितीने हा कार्यक्रम आयोजित केला असून मोदी हे मुख्य अतिथी तर अडवाणी आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे विशेष अतिथी असतील.
स्वातंत्र्यसेनानी घोषित करणार?
आणीबाणीच्या काळात ‘मिसा’अंतर्गत जेलमध्ये गेलेल्या रा. स्व. संघाशी संलग्न संस्थांमधील नेते आणि स्वयंसेवकांचा प्रथमच सन्मान केला जात आहे. भाजपशासित दोन राज्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना स्वातंत्र्यसेनानी घोषित केले असले तरी केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नव्हती. याप्रसंगी केंद्र सरकारकडूनही त्यांना स्वातंत्र्यसेनानी जाहीर केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.