तणावात भावनिक क्षण घेऊन आली 'समझोता एक्स्प्रेस'
By admin | Published: September 28, 2016 10:05 AM2016-09-28T10:05:48+5:302016-09-28T10:18:38+5:30
उरीमधल्या दहशतवाही हल्ल्यानंतर समझोता एक्स्प्रेस मंगळवारी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव प्रवाशांचा चेह-यावर दिसत नव्हता.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर समझोता एक्स्प्रेस मंगळवारी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव प्रवाशांचा चेह-यावर दिसत नव्हता. आठवड्यातून दोन दिवस लाहोरहून निघणारी ही एक्स्प्रेस पंजाबहून दिल्ली टर्मिनसला येते. मंगळवारी आलेल्या एक्स्प्रेसमध्ये एकूण 184 प्रवासी होते. यातले 84 प्रवासी हे पाकिस्तानी तर उरलेले सर्व भारतीय होते. गेल्या आठवड्यात उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर यावेळी प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. मात्र, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा समझोता एक्स्प्रेसनं प्रवास करणा-यांवर काहीही परिणाम झालेला दिसला नाही.
मेरठमधले रहिवासी मोहम्मद नौशाद कराचीहून येणारा चुलत भाऊ शहजाद कुरेशीला भेटण्यासाठी प्रचंड आतूर होते. 'दोन्ही देशांमधली परिस्थिती तणावपूर्ण आहे. मात्र, टीव्हीच्या माध्यमातून खरे कमी आणि अफवा जास्त पसरवल्या जातात', असं नौशाद यांनी यावेळी सांगितले. याचवेळी एक भावनिक क्षणदेखील पाहायला मिळाला. 50 वर्षांचे शहजाद जेव्हा एक्स्प्रेसमधून उतरले, त्यावेळी त्यांनी आपल्या चुलत भावाला मिठी मारली. या दोघांच्या आयुष्यातील ही पहिली भेट. तब्बल 36 वर्षांनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेले शहजाद याआधी आपल्या भावाला भेटले नव्हते. यापूर्वी मी इथे कधी आलो होतो, हे देखील मला आठवत नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी शहजाद यांनी दिली.
एक्स्प्रेस येताच प्लेटफॉर्म पूर्णतः सामानांनी व्यापून गेले. पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी आपल्या नातेवाईकांसाठी भरभरुन भेटवस्तूही आणल्या. दरियागंजमध्ये राहणारे मोहम्मद अकील आपल्या भावाला भेटण्यासाठी कराचीला गेले होते. इथून मायदेशी परतताना त्यांनी ब-याच भेटवस्तू भारतात राहणा-या नातेवाईक आणि मित्रमंडळींसाठी आणल्या. उरी दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधली परिस्थिती अस्थिर झालेली असतानाही अकील आपला व्हिसा 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात यशस्वी ठरले. सामान्यांना युद्ध वगैरे काही नकोय, आमच्यासाठी पाकिस्तान घराप्रमाणे आहे, कारण आमचे नातेवाईक त्याठिकाणी राहत आहेत, असेही यावेळी अकील यांनी म्हटले.
काही तास प्लेटफॉर्मवर असेच भावनिक वातावरण होते, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अनेक जण आपल्या नातेवाईकांची भेट घेत होते. काही क्षण हृदयात, डोळ्यामध्ये साठवत होते. 1976 पासून समझोता एक्स्प्रेसची सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर 2001 मध्ये संसदेवरचा दहशतवादी हल्ला आणि 2007 मध्ये पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर ही एक्स्प्रेस थांबवण्यात आली होती. या दोन घटना वगळता दोन देशांमधल्या सीमेमुळे दुरावलेल्या लोकांना जवळ आणण्याचं काम गेल्या 40 वर्षांपासून ही एक्स्प्रेस आजपर्यंत करत आली आहे.