आईचं मंगळसूत्र विकून चालान भरायला आला तरूण; सत्य ऐकून ARTOना देखील राहावलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 05:35 PM2022-06-16T17:35:30+5:302022-06-16T17:35:37+5:30
तरूणाकडून सत्य ऐकल्यानंतर एआरटीओंनी आपल्या पगारातून तरूणाच्या दंडाची रक्कम भरली.
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील एआरटीव्हो आरसी भारती यांच्यातील माणूसकी दिसून आली आहे. उपविभागीय परिवहन अधिकाऱ्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र विकून दंडाची रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या तरुणाचे सत्य जाणून घेतल्यानंतर आपल्याच पगारातून दंडाची रक्कम भरली. त्या तरुणाच्या वाहनाला २४,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
बुधवारी महाराजगंज जिल्ह्यातील एआरटीओ कार्यालयात असा काहीसा प्रकार घडला, जो ऐकून सर्वजण हळहळले आणि एआरटीओंचे कौतुकही करू लागले. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या तरूणाच्या वडिलांच्या रिक्षाचं २४५०० रूपयांचं चालान कापण्यात आलं होतं. तो दंडाची रक्कम भरायला आला खरा, परंतु आईचं मंगळसूत्र विकल्यानंतरही रक्कम कमी पडत होती. ही गोष्ट जेव्हा आरसी भारती यांना समजली तेव्हा त्यांनी आपल्याच पगारातून दंडाची रक्कम भरली आणि शिक्षण सोडलेल्या तरूणाला पुन्हा एकदा शिक्षण सुरू करण्याचं आवाहनही केलं. एआरटीओ कार्यालयात जेव्हा विजय नावाचा तरूण दंडाची रक्कम भरण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील तणाव पाहून एआरटीओंनी त्याला बोलावून कारण विचारलं.
आपले वडिल राजकुमार हे रिक्षाचालक आहे आणि त्यांना एका डोळ्यानं कमी दिसतं. २४५०० रूपयांचं चालान जमा करायचं आहे. आईचं मंगळसूत्र विकल्यानंतरही १३ हजार रूपये जमा झाले. कुटुंबात सहा बहिणीही आहेत, असं त्यानं सांगितलं. ही गोष्ट ऐकल्यानंतर भारती यांना राहावलं नाही आणि त्यांनी तरूणाची मदत केली. त्यांनी दंडाची रक्कम जमा करण्याशिवाय इन्शुरन्सही करून दिला.