राष्ट्रपतीपदासाठी मोहनराव भागवतांच्या नावाची जोरदार चर्चा

By admin | Published: March 24, 2017 09:11 PM2017-03-24T21:11:23+5:302017-03-24T21:11:23+5:30

भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी जुलै महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राजधानी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू

Emphasis on the name of Mohanrao Bhagwat for the post of President | राष्ट्रपतीपदासाठी मोहनराव भागवतांच्या नावाची जोरदार चर्चा

राष्ट्रपतीपदासाठी मोहनराव भागवतांच्या नावाची जोरदार चर्चा

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 24 : भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी जुलै महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राजधानी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. शुक्रवारी रात्री सरसंघचालक भागवत दिल्लीत येत असून पुढले दोन दिवस त्यांचे वास्तव्य राजधानीतच असल्याने या चर्चेला विशेष उधाण आले आहे. पाच राज्यांच्या अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर, जुलै महिन्यातल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या पसंतीचा राष्ट्रपती निवडून आणण्याची क्षमता आणि संख्याबळ भाजपकडे आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी नुकतीच योगी आदित्यनाथ यांची निवड झाली.

रा.स्व. संघाने त्यात महत्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे सर्वोच्च घटनात्मक पद भाजपला मार्गदर्शन करणारी मातृसंस्था रा.स्व.संघाच्या सर्वोच्च व्यक्तिकडेच का नसावे? असा विचार सुरू झाला. भागवतांना संधी मिळाल्यास देशात व जगात संघाबाबत पसरवण्यात आलेला गैरसमजही दूर होईल व देशाला एक कणखर राष्ट्रपती मिळेल अशी चर्चा सुरू झाल्याचे समजले आहे. रा.स्व. संघात डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरूजींनंतर मोहनराव भागवतांचे नाव कणखर व तत्वनिष्ठ सरसंघचालक म्हणून घेतले जाते. के.एस.सुदर्शन यांच्यानंतर २१ मार्च २00९ साली मोहनराव भागवतांनी सरसंघचालक पदाची सूत्रे हाती घेतली. देशभर संघपरिवाराच्या विविध शाखांचा व भाजपचाही त्यांच्या कारकिर्दीत व्यापक व लक्षवेधी विस्तार झाला. निवडणुकांमधे भाजपला हमखास विजय प्राप्त करून देणारी संघाची मजबूत व सतर्क यंत्रणा तयार करण्यातही भागवतांनी विशेष मेहेनत घेतली आहे.

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात १९५0 साली जन्मलेल्या भागवतांनी चंद्रपूरच्याच जनता कॉलेजमधून बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर नागपूरच्या सरकारी पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुविज्ञान शाखेचीही पदवी मिळवली. याच शाखेचे पदव्युत्तर शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ संघाच्या प्रचारकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. सुरूवातीला महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यात प्रचारक म्हणून कामगिरी बजावल्यानंतर विदर्भ व नागपुरात प्रांतचालकापर्यंत वेगवान प्रगती करीत कालांतराने राष्ट्रीय स्तरावर भागवत संघाचे सरकार्यवाह झाले.

सुदर्शन यांच्यानंतर सरसंघचालकपदासाठी भागवतांच्या तुलनेत संघाकडे दुसरे नाव नव्हते. असे म्हणतात की रा.स्व.संघाचे सरसंघचालकपद हे सक्रिय राजकारणापासून दूर असल्याने पंतप्रधानपदापेक्षाही मोठे आहे, असे संघात मानले जाते. बहुदा त्याला अनुसरूनच पंतप्रधान मोदींच्या शपथविधीलाही भागवत उपस्थित नव्हते. केंद्रात मोदी सत्तेवर आल्यापासून आजतागायत पंतप्रधानांच्या ७ रेसकोर्स या अधिकृत निवासस्थानीही भागवत फिरकलेले नाहीत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यासाठी कृष्णमेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या एकमेव सोहळयात पंतप्रधान मोदी आणि मोहनराव भागवत सार्वजनिकरित्या एकत्र दिसले.

संघाच्या तत्वज्ञानाबद्दल इतकी निष्ठा बाळगणारे भागवत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला सहजासहजी तयार होतील काय? हा प्रश्न देखील या निमित्ताने चर्चेत आहे. संघाच्या दिल्लीतील सूत्रांशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र या विषयी अधिकृत अथवा अनधिकृतरित्या कोणतेही भाष्य करायला कोणी तयार नाही.  (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Emphasis on the name of Mohanrao Bhagwat for the post of President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.