प्रसारमाध्यमांतूनच प्रचाराचा जोर, धारवाड जिल्ह्यातील चित्र; हुबळीत घरोघरी प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 04:36 PM2023-05-04T16:36:44+5:302023-05-04T17:41:41+5:30

सर्वच पक्षांनी प्रचाराचा धूमधडाका लावला असला रस्त्यांवर मात्र निवडणुकीचे कसलेही वातावरण दिसत नाही

Emphasis of propaganda through mass media, picture from Dharwad district | प्रसारमाध्यमांतूनच प्रचाराचा जोर, धारवाड जिल्ह्यातील चित्र; हुबळीत घरोघरी प्रचार

प्रसारमाध्यमांतूनच प्रचाराचा जोर, धारवाड जिल्ह्यातील चित्र; हुबळीत घरोघरी प्रचार

googlenewsNext

चंद्रकांत कित्तुरे

हुबळी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी धारवाड जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत सर्वच पक्षांनी प्रचाराचा धूमधडाका लावला असला रस्त्यांवर मात्र निवडणुकीचे कसलेही वातावरण दिसत नाही. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वृत्तपत्रांमधूनच निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे.

कर्नाटकातील विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होत आहे. भाजप सत्ता राखणार की कॉंग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार यावर जोरदार चर्चा प्रसारमाध्यमांत सुरू आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हुबळी मतदारसंघात दुपारच्या वेळेत फेरफटका मारला असता सारे काही शांत शांत असल्याचे जाणवले.

उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणारी वाहने नाहीत की रस्त्यांवर मोठमोठाले बॅनरही नाहीत. प्रचार कार्यालयात तेवढीच कार्यकर्त्यांची लगबग जाणवते. नाही म्हणायला प्रचारसभांना गर्दी असते. मात्र ती उत्स्फूर्त असते की जमवलेली, हा संशोधनाचा विषय आहे.

९२ उमेदवार रिंगणात

धारवाड जिल्ह्यातील सात मतदारसंघांत ९२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांतील सर्वाधिक चर्चेत आहेत माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर. भाजपने उमेदवारी नाकारल्याने कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी भाजपलाच आव्हान दिले आहे. हुबळी-धारवाड मध्य या मतदारसंघात त्यांची थेट लढत भाजपचे महेश टेंगिनकाई यांच्याशी होत आहे. हे दोन्ही उमेदवार भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे आहेत; यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते त्यांच्या विजयासाठी सभा घेत आहेत. बुधवारी कॉंग्रेस नेते, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची हुबळीत पत्रकार परिषद झाली; तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची रात्री टेंगिनकाई यांच्यासाठी प्रचारसभा झाली.

घरोघरी भेटी, कोपरासभांवर जोर

काही राजकीय कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता, आमचा आणि उमेदवारांचा मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर आहे. कोपरासभाही सुरू आहेत. त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख उमेदवार असे

कलघटगी मतदारसंघ- नागराज छाब्बी (भाजप), संतोष लाड (कॉंग्रेस), मंजुनाथ जक्कन्नावर (आप), वीराप्पा शिगागट्टी (जेडीएस) आणि इतर आठजण.
धारवाड ग्रामीण - अमृत देसाई (भाजप), विनय कुलकर्णी (काँग्रेस), मंजुनाथ हेगेदार (जेडीएस) आणि इतर आठजण.
हुबळी धारवाड पश्चिम - अरविंद बेल्लद (भाजप), दीपक चिंचोरे (कॉंग्रेस), गुरुराज हुनशीमरद (जेडीएस) आणि इतर १२ जण हुबळी-धारवाड मध्य- जगदीश शेट्टर (कॉंग्रेस), महेश टेंगिनकाई (भाजप), सिद्धलिंगेश्वरगौडा महंतवोडियार (जेडीएस) आणि इतर १३ जण; हुबळी-धारवाड पूर्व (राखीव) - प्रसाद अब्बय्या ( कॉंग्रेस), डॉ. क्रांतिकिरण (भाजप) आणि इतर आठजण.
कुंडगोल - एम. आर. पाटील (भाजप), कुसुमावती शिवाली (कॉंग्रेस) आणि इतर १२ जण
नवलगुंद- शंकर पाटील मुनेनकोप्प (भाजप), एन. एच. कोनारडी (कॉंग्रेस) आणि इतर ११ जण.

Web Title: Emphasis of propaganda through mass media, picture from Dharwad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.