जाहीरनाम्यांमध्ये पर्यावरणावर भर! राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टिकोनात झाला चांगला बदल, तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 09:47 AM2024-04-18T09:47:59+5:302024-04-18T09:49:02+5:30
वन आणि वन्यजीव रक्षण यासह काही बाबींमध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय व राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने यात विरोधाभास आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दोन दशकांपूर्वी काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यात पर्यावरण या विषयाबद्दल काही ओळीच असायच्या; पण आता हवामान बदल, पर्यावरणाचे झालेले नुकसान याबद्दल आता काही पाने असतात. हा बदल सुखावह आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले. पर्यावरणाच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांनी अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली, हे स्वागतार्ह आहे. या बद्दल विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थेतील संशोधक देवादित्य सिन्हा यांनी सांगितले की, पर्यावरण धोरणाच्या काही बाबींमध्ये मोठ्या सुधारणा
होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबद्दल भाजपने आपल्या जाहीरनाम्यात काहीही उल्लेख केलेला नाही. वन आणि वन्यजीव रक्षण यासह काही बाबींमध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय व राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने यात विरोधाभास आहे. त्यामुळे पर्यावरण व वने यांच्या रक्षणाबाबतची काही आश्वासने ही प्रतीकात्मक ठरली असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांना वाटते. भाजपने आपला ६९ पानांचा जाहीरनामा गेल्या शनिवारी प्रसिद्ध केला. त्यात तीन पाने पर्यावरण, हवामान बदल या विषयाला वाहिलेली आहेत. शाश्वत भारतासाठी मोदी यांची गॅरंटी या विभागात ही पाने समाविष्ट करण्यात आली आहेत.
१९९९च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पर्यावरण रक्षणाबद्दल फक्त एक परिच्छेद होता. हवामान बदल हा शब्द भाजपने १९९९ व २००४ साली प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात वापरलाच नव्हता.
हवामान बदलाच्या मुद्द्याला महत्त्व
यंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, पाणी याच्याशी संबंधित मुद्द्यांसाठी दोन पाने राखून ठेवली आहेत. या दोन्ही पक्षांनी गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यांशी तुलना केली असता यंदा त्यांनी हवामान बदल, पर्यावरणीय शाश्वतता या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते.