भाजपा आमदाराच्या शासकीय निवासस्थानी कर्मचाऱ्याची आत्महत्या; परिसरात खळबळ, तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 10:38 AM2023-09-25T10:38:32+5:302023-09-25T10:47:31+5:30
आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.
नवी दिल्ली: भाजपा आमदार योगेश शुक्ला यांच्या हजरतगंज येथील आमदार निवासाच्या फ्लॅट क्रमांक ८०४ मध्ये रविवारी रात्री उशिरा त्यांच्या मीडिया सेलच्या कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हजरतगंजचे निरीक्षक प्रमोद कुमार पांडे यांनी सांगितले की, बाराबंकी हैदरगढचा रहिवासी २४ वर्षीय श्रेष्ठ तिवारी बीकेटी आमदाराच्या मीडिया सेलमध्ये काम करत असे. रविवारी रात्री तो फ्लॅटमध्ये एकटाच होता. रात्री साडेअकराच्या सुमारास श्रेष्ठ यांनी गळफास लावून घेतला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अद्याप कोणतीही सुसाईड नोट वगैरे जप्त करण्यात आलेली नाही. आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी श्रेष्ठने ओळखीच्या किंवा नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्याने ज्या व्यक्तीला फोन केला होता त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक फ्लॅट क्रमांक ८०४ वर पाठवण्यात आले. दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी तो दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता श्रेष्ठ हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे.