बायोमेट्रीक हजेरीला कर्मचाऱ्यांचा असाही 'ठेंगा'; आधारमध्येही होतेय गडबड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 11:40 AM2018-10-10T11:40:11+5:302018-10-10T11:44:31+5:30
मस्टरवर हजेरी लावण्याच्या काळात कर्मचारी आठवड्याने किंवा महिन्यातून एकदा सर्व सह्या करत ठकवत असल्याने तंत्रज्ञानाची कास धरून कंपन्यांनी बायोमेट्रीक पद्धत आणली होती.
चंदौली : मस्टरवर हजेरी लावण्याच्या काळात कर्मचारी आठवड्याने किंवा महिन्यातून एकदा सर्व सह्या करत ठकवत असल्याने तंत्रज्ञानाची कास धरून कंपन्यांनी बायोमेट्रीक पद्धत आणली होती. आता या अंगठा लावण्याच्या बायोमेट्रीक पद्धतीला कर्मचाऱ्यांनी ठेंगा दाखविला असून काही रुपयांत नकली अंगठ्याद्वारे कार्यालयायतून फरार होत आहेत.
ऑफिसमध्ये उशिराने येणे, दांडी मारूनही हजर असल्याची सही करणे, ऑफिसमध्ये येऊन हजेरी लावून बाहेर मजा मारण्यास जाणे आदी धंदे कर्मचाऱ्यांकडून बऱ्याचदा केले जात होते. यामुळे बोटांचे ठसे घेऊन बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी लावण्यात येत आहे. मात्र, या पद्धतीलाही कर्मचाऱ्यांनी उतारा शोधून काढला आहे. उशिराने येऊनही कर्मचारी वेळेत असल्याचे या नकली अंगठ्यामुळे शक्य झाले आहे.
सरकारी कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांनी आपल्या हाताच्या ठशाचे नकली अंगठे बनवून घेतले आहेत. कारण हे कर्मचारी बायोमेट्रीक हजेरीमुळे हौरान झाले आहेत. मात्र, बाजारात 300 ते 500 रुपयांमध्ये असे नकली अंगठे बनवून मिळू लागल्याने कर्मचारी पुन्हा कार्यालयातून गायब होऊ लागले आहेत.
असा बनविला जातो अंगठा
साध्या कागदावर अंगठ्याचे ठसे घेतले जातात. स्कॅनरच्या मदतीने हा ठसा स्कॅन केला जातो. फोटोशॉपच्या मदतीने हे ठसे सुस्पष्ट केले जातात. यानंतर या ठशांचे पॉलिमर केमिकलद्वारे रबरवर उमटविले जातात. या रबरचा वापर हे कर्मचारी एकमेकांची हजेरी लावण्यासाठी करत आहेत.
आधारसाठीही धोका
अशा प्रकारच्या नकली अंगठ्यांच्या ठशाचा वापर आधारसाठीही केला जात आहे. आधार कार्ड बदल, बनावट सिम कार्ड मिळविण्यासाठीही या ठशांचा वापर होऊ शकतो. एवढेच नाही तर आधार कार्ड सुपरवायझर अशा प्रकारचे स्टँप बनवत असून याद्वारे एकाच दिवशी अनेक ठिकाणी कँप लावत आहेत. या एजंट किंवा सुपरवायझरना कोणाचेही आधार बनविताना अंगठा लावावा लागतो. यानंतर त्या व्यक्तीला आधार बनविण्याचा अधिकार मिळतो. या नकली अंगठ्यामुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत.