सरकारी कार्यालयात आता जीन्स, टी-शर्ट घालण्यास बंदी; फॉर्मल कपडे घालूनच या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 12:49 PM2019-08-30T12:49:08+5:302019-08-30T12:49:29+5:30
सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात फॉर्मल कपडे परिधान करावेत
पटणा - बिहार सरकारने सचिवालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक फर्मान जारी केलं आहे. या आदेशानुसार सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना आता कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी करण्यात आली आहे. सचिवालयात येताना फॉर्मल कपडे घालून या असं आदेशात म्हटलं आहे. इतकचं नाही तर भडक रंगाचे कपडेही घालण्यास मज्जाव केला आहे.
बिहार राज्य सरकारचे सचिव शिव महादेव प्रसाद यांनी आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटलं आहे की, सचिवालायत अधिकारी आणि कर्मचारी यांनी संस्कृतीच्या विरोधात कॅज्युअल कपडे घालून कार्यालयात येऊ नये. त्यांनी फॉर्मल कपडे घालूनच कार्यालयात यावे. अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयातील संस्कृतीच्या विरोधात जाऊन कॅज्युअल कपडे परिधान करू नये त्यामुळे कार्यालयाची प्रतिमा खराब होईल.
सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात फॉर्मल कपडे परिधान करावेत. त्यात साध्या रंगाचे कपडे, आरामदायक, प्रतिमेला शोभून दिसतील असे योग्य कपडे घालून कार्यालयात यावे असं आदेशात म्हणण्यात आलं आहे. प्रशासनाकडून चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड दिला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना विशेष दिवशी ड्रेसकोड निर्धारित केलेत. मात्र आता सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या नियमाचं पालन करावं लागणार आहे.