केंद्राचे कर्मचारी, पेन्शनर मालामाल होणार! ४ टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी सुरु, दिवाळीच दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 04:50 PM2023-10-07T16:50:13+5:302023-10-07T16:50:54+5:30
ऑक्टोबरच्या पगारातच या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे.
एकीकडे महागाई नियंत्रणात येणार असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. लोकांनी भविष्यातील संकटांसाठी साठवून ठेवलेले धनही संपत चाललेले असताना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची आणि पेन्शन धारकांची यंदाची दिवाळी चांदीतच साजरी होणार आहे. या आजी माजी कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे.
या वाढीचा प्रस्ताव कोणत्याही दिवशी कॅबिनेट बैठकीसमोर येऊ शकतो. ऑक्टोबरच्या पगारातच या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे.
गेल्या वर्षी २४ ऑक्टोबरला दिवाळी होती. तेव्हा केंद्राने २८ सप्टेंबरलाच डीए चार टक्क्यांनी वाढविला होता. आता दिवाळी थोडी उशिराने असून १२ नोव्हेंबरला साधारण महिना असताना हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे (AIDEF) सरचिटणीस सी. श्रीकुमार यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी डीए ४६ टक्के होणार आहे.
तसेच सरकारने संसदेत आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास नकार दिला असला तरी, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा जानेवारी 2024 नंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली जाईल, असे केंद्रीय कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. 2013 मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता.
जानेवारी 2024 मध्ये, जेव्हा डीएमध्ये (संभाव्य) चार टक्के वाढ होईल आणि महागाई भत्ता 50% असेल, तेव्हा केंद्र सरकारला नवीन वेतन आयोग जाहीर करावा लागेल, असा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे.