अच्छे दिन येणार? आठवड्यात ५ ऐवजी ४ दिवसच काम करावं लागणार? मोदी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 07:56 IST2021-06-19T07:52:56+5:302021-06-19T07:56:55+5:30
बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत बदल होणार; टेक होम सॅलरी घटणार

अच्छे दिन येणार? आठवड्यात ५ ऐवजी ४ दिवसच काम करावं लागणार? मोदी सरकार नियम बदलण्याच्या तयारीत
नवी दिल्ली: कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास आणि दिवस कमी होण्याची शक्यता आहे. नव्या लेबर कोडच्या नियमांमध्ये बदल करण्याची तयारी मोदी सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे लवकरच आठवड्यातून ५ ऐवजी ४ दिवसच काम करावं लागेल आणि २ दिवसांऐवजी ३ दिवस सुट्टी असेल. देशात येणाऱ्या नव्या कामगार कायद्यांच्या अंतर्गत येत्या काही दिवसांत आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळू शकेल.
नव्या लेबर कोड नियमांमध्ये आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी असा पर्याय ठेवला जाईल. यावर कंपनी आणि कर्मचारी सहमतीनं निर्णय घेऊ शकतात. कामाचे तास वाढवून ते १२ तासांपर्यंत नेण्याचा समावेश नव्या नियमांमध्ये करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार कर्मचारी आठवड्याला कमाल ४८ तास काम करेल. त्यामुळे अशा परिस्थितीत कामाचे तास कमी होऊ शकतात. 'मनीकंट्रोल'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
एका दगडात दोन पक्षी! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
कामाचे तास १२ करण्याचा प्रस्ताव
नव्या कायद्याच्या मसुद्यात कामाचे तास वाढवून १२ करण्याचा प्रस्ताव आहे. कर्मचाऱ्यानं १५ ते ३० मिनिटं अधिक काम केल्यास ही अतिरिक्त वेळ ३० मिनिटं मानून त्याचा ओव्हरटाईममध्ये समावेश करण्याचादेखील प्रस्ताव आहे. सध्या ३० मिनिटांपेक्षा कमी वेळ काम केल्यास तो ओव्हरटाईम मानला जात नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याकडून सलग ५ तास सलग काम करून घेऊ नये अशीही एक तरतूद नियमांच्या मसुद्यात आहे. कर्मचाऱ्यांना पाच तासांनी अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा लागेल.
वेतन कमी होणार, पीएफ वाढणार
नव्या नियमांच्या मसुद्यानुसार, एकूण पगारात बेसिक पगाराचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक असायला हवा. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत बदल होईल. टेक होम सॅलरी कमी होईल आणि पीएफची रक्कम वाढेल.