भारतातील या शहरात सर्वाधिक तणावाखाली काम करणारे नोकरदार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 08:43 PM2017-10-12T20:43:55+5:302017-10-12T20:44:53+5:30
देशामध्ये सर्वाधिक तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांवर केलेला सर्वे समोर आला आहे. या यादीत तुम्ही काम करत असलेलं शहर तर नाही ना?
मुंबई - देशामध्ये सर्वाधिक तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांवर केलेला सर्वे समोर आला आहे. यादीत स्वप्ननगरी मुंबईतील कामकार पहिल्या स्थानावर आहे. लीब्रेट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुंबईतील सुमारे 31 % कर्मचारी तणावग्रस्त असल्याची चिंताजनक आकडेवारी लीब्रेटच्या सर्वेतून समोर आली आहे. देशभरातील मेट्रो शहरातील 60 टक्के लोक हे तणावग्रस्त असल्याची चिंताजनक आकडेवारीही समोर आली आहे.
मुंबईनंतर या यादीत राजधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्लीमध्ये 27 टक्के कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत. यानंतर बंगळुरु (14 %), हैदराबाद (11 %), चेन्नई (10 %) आणि कोलकाता (7 %) यांचा क्रमांक लागतो. 10 ऑक्टोबर 2016 ते 10 ऑक्टोबर 2017 या एका वर्षामध्ये लीब्रेटनं एक लाख पेक्षा आधिक जणांचा सर्वे केला. यामध्ये त्यांनी अनेक डॉक्टरांची मदत घेतली.
तणावाखाली असलेले बहुतांश लोक त्यांचे मित्र आणि कुटुंबाशी याबद्दल संवाद साधत नाहीत, असे लीब्रेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक सौरभ अरोरा यांनी म्हटले. तणावाचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या भावना मित्र किंवा कुटुंबीयांकडे व्यक्त करण्याची गरज आहे. त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवायला हवी, असेही ते म्हणाले. नेमक्या कोणत्या कारणामुळे आपण तणावाखाली आहोत, हे संबंधित व्यक्तीने शोधायला हवे.एकदा कारण शोधल्यावर तणाव कमी करण्यासाठी पावले उचलणे सोपे होते. दीर्घ कालावधीपासून तणाव कायम राहिल्यास गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात, असा धोक्याचा इशाराही अरोरा यांनी दिला.