देशातील ९० लाख कामगारांचा रोजगार बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:28 AM2019-11-18T02:28:11+5:302019-11-18T06:21:22+5:30
सेवा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रातील रोजगारांत कमालीची घट
गेल्या सात वर्षांमध्ये देशातील तब्बल ९० लाख नोकरदारांचा रोजगार बुडाला असून, देशाच्या इतिहासातील हा मोठा आकडा असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. सेवा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रातील रोजगारांत कमालीची घट झाली आहे. नवरोजगारनिर्मितीचा वेगही अत्यंत कमी असल्याचे प्रबंध सांगतो.
अझीम प्रेमजी विद्यापीठाने २०११-१२ ते २०१७-१८ या कालावधीतील रोजगारनिर्मितीचा अभ्यास केला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे. ‘इंडियाज एम्प्लॉयमेंट क्रायसेस: रायझिंग एज्युकेशन लेव्हल्स अॅण्ड फॉलिंग नॉन अॅग्रीकल्चरल जॉब ग्रोथ’ हा प्रबंध त्यांनी नुकताच सादर केला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक संतोष मेहरोत्रा आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ पंजाबमधील प्राध्यापक जे. के. पारिडा यांनी हा प्रबंध लिहिला आहे.
खासगी आणि सरकारी या दोन्ही क्षेत्रात अस्थायी स्वरुपाच्या काही रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. तिच स्थिती असंघटित क्षेत्राचीदेखील आहे. तसेच, २०११-१२ नंतर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील पगारदारांच्या मूळ वेतनामधे देखील फारशी वाढ झालेली दिसत नाही.
कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी गेल्या सात वर्षांत ४५ लाख याप्रमाणे घटल्या आहेत. उत्पादन क्षेत्रातील ३५ लाख रोजगार याच कालावधीत बुडाले आहेत. त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील रोजगाराचा दरही खालावला आहे. हाताला काम नसलेल्या युवकांची संख्या दहा कोटींवर पोहोचली आहे.