पारंपरिकच नव्हे, आधुनिक क्षेत्रांत निर्माण केल्या रोजगाराच्या संधी - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 01:26 PM2023-10-29T13:26:23+5:302023-10-29T13:26:42+5:30
५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आपल्या सरकारने पारंपरिक क्षेत्राबरोबरच नूतनीकरणीय ऊर्जा, संरक्षण उद्योग तथा स्वयंचलितीकरण यांसारख्या नव्या क्षेत्रांतही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. ‘रोजगार मेळावा’ मोहिमेंतर्गत विविध सरकारी विभागांतील ५१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी आभासी पद्धतीने करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
लाखो नोकऱ्या
मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्यांतील भाजप सरकारने गेल्या ऑक्टोबरपासून ‘रोजगार मेळाव्यां’चे आयोजन केले. त्याअंतर्गत लाखो युवकांना नियुक्ती पत्रे दिली.
पारदर्शक भरती प्रक्रिया
सरकार केवळ रोजगारनिर्मितीच करीत नसून भरती प्रक्रिया पारदर्शक राहील, याचीही काळजी घेत आहे. भरती परीक्षा प्रक्रियेची पुनर्रचना करण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत. नोकर भरतीच्या परीक्षा आता हिंदी आणि इंग्रजीव्यतिरिक्त १३ विभिन्न प्रादेशिक भाषांत
घेतल्या जात आहेत. त्याचा तरुणांना लाभ होत आहे. भरती प्रक्रियेसाठी लागणारा कालावधीतही कपात केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.