मनसेच्या माजी शहर उपाध्यक्षास सक्तमजुरीची शिक्षा
By Admin | Published: September 20, 2016 11:19 PM2016-09-20T23:19:26+5:302016-09-20T23:40:47+5:30
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परप्रांतियांविरोधातील आंदोलनादरम्यान सातपूरच्या शाळेत २६ जानेवारी रोजी महापालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात तोडफोड करून पोलीस कर्मचार्यांना मारहाण व हुज्जत घातल्याप्रकरणी मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष संदीप चंद्रकांत वझरे यांना मंगळवारी (दि़२०) प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी एक वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परप्रांतियांविरोधातील आंदोलनादरम्यान सातपूरच्या शाळेत २६ जानेवारी रोजी महापालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात तोडफोड करून पोलीस कर्मचार्यांना मारहाण व हुज्जत घातल्याप्रकरणी मनसेचे माजी शहर उपाध्यक्ष प्रदिप चंद्रकांत वझरे यांना मंगळवारी (दि़२०) प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी एक वर्षे सक्तमजुरी व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २००९ मध्ये उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन सुरू केले होते़ २६ जानवारी २००९ रोजी सातपूरच्या महाराष्ट्र हौसिंग कॉलनीतील महापालिकेची शाळा क्र. ९५ व ९६ मध्ये उत्तर भारतीयांकडून राष्ट्रीय एकात्मता अभियान कार्यक्रम सुरू होता़ यावेळी प्रदिप वझरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळविण्याचा प्रयत्न केला़ त्यांना सातपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी किशोर महाले व प्रसाद बैरागी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता वझरे व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली़
तसेच कार्यक्रमातील साउंड सिस्टीम, खुर्च्या व सामानाची तोडफोड व नासधूस केली़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात वझरे यांच्यासह सुमारे वीस मनसे कार्यकर्त्यांविरोधात शासकीय कामात अडथळा यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा खटला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या न्यायालयात सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी सोळा साक्षीदार तपासून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे सादर केले़
या खटल्यात न्यायालयाने प्रदिप वझरे यांना भादंवि कलम (१४७, ३२३, ३५३ ,४३५, ४५२) अन्वये दोषी ठरवून एक वर्षे सक्तमजुरी व ६ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १२० दिवस सक्तमजुरी शिक्षा सुनावली़ या दंडाच्या रकमेतील पाच हजार रुपये पोलीस कर्मचारी महाले, तर साक्षीदार बैरागी यांना पाचशे रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दरम्यान, या खटल्यातील रमेश साळुंखे, गोकूळ पगारे, ऋषीकेश चौधरी व समाधान जाधव यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)