हरियाणा : उडत्या विमानाची टाकी रिकामी केली, सगळी घाण पडली शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:56 AM2018-01-22T00:56:47+5:302018-01-22T02:21:00+5:30
फझीलपूर बदली गावातील शेतात शनिवारी आकाशातून एक गोष्ट येऊन पडली. गावातील लोकांना वाटले की या शेतात उल्काच कोसळली. मग त्याची गावभर चर्चा झाली. मग शास्त्रज्ञ आले. त्यांनी तपासणी केली. शेतात जे काही पडले होते ते उल्का नव्हती तर ती होती मानवी विष्ठा.
गुरुग्राम : फझीलपूर बदली गावातील शेतात शनिवारी आकाशातून एक गोष्ट येऊन पडली. गावातील लोकांना वाटले की या शेतात उल्काच कोसळली. मग त्याची गावभर चर्चा झाली. मग शास्त्रज्ञ आले. त्यांनी तपासणी केली. शेतात जे काही पडले होते ते उल्का नव्हती तर ती होती मानवी विष्ठा. गुरुग्रामवरुन उड्डाण करणा-या विमानाच्या शौचालयातील मानवी विष्ठेने भरलेली टाकी रिकामी करण्यात आली होती व ती सारी घाण पडली या शेतात...
उड्डाण करत असताना विमानाच्या शौचालयातील मानवी विष्ठेने भरलेली टाकी वस्ती असलेल्या भागांवरून जाताना रिकामी करणे टाळावे असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने २० डिसेंबर २०१६ रोजी दिला होता. या आदेशाचीच आठवण करुन देणारे परिपत्रक सर्व विमान कंपन्यांना पुन्हा जारी करावे, असे न्यायादिकरणाने दहा दिवसांपूर्वीच नागरी विमान वाहतूक खात्याला कळविले होते. उड्डाण करत असताना विमानाच्या शौचालयातील मानवी विष्ठेने भरलेली टाकी रिकामी केल्याचे निदर्शनास आल्यास त्या विमान कंपनीला ५० हजार रुपये दंड ठोठाविण्यात येईल, असेही या आदेशात बजावण्यात आले होते. त्यानंतर १० दिवसांनी हा नवा प्रकार घडला आहे.
विमानातून मानवी विष्ठा फझीलपूर बदली गावातील ज्याच्या शेतात टाकण्यात आली तो शेतमालक बलवान म्हणाला की, शनिवारी सकाळी आठ वाजता आकाशातून एक गोष्ट शेतात येऊन पडली. ती नेमकी काय आहे हे पाहाण्यासाठी लोक गोळा होऊ लागले. गर्दी वाढू लागल्यामुळे सरतेशेवटी सरपंच गोविंद सिंग यांना पाचारण केले गेले. सरपंचाने पोलिसांनी ही घटना कळविली.
मीही शेताकडे धाव घेतली व आकाशातून पडलेली ती गोष्ट पाहिली. तिचे वजन ८ ते १० किलो असावे. हा न वितळणारा बर्फ असावा असेही आम्हाला वाटले. त्या गोष्टीला हात लावणे कदाचित धोक्याचे ठरु शकेल म्हणून ते धाडस केले नाही.(वृत्तसंस्था)
वैज्ञानिकांनी केली तपासणी-
शेतात पडलेली ही वस्तू नेमकी काय आहे हे तपासण्यासाठी सरतेशेवटी पोलिसांनी हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाºयां पाचारण केले. त्यांनी केलेल्या तपासणीत ही मानवी विष्ठा असल्याचे निष्पन्न झाले. विमान खूप उंचावरून उड्डाण करत असताना, शौचालयाच्या टाकीतून गळती होऊन विष्ठा खाली पडली, तर कमी तापमानामुळे ती जमिनीवर येऊन पडेपर्यंत बर्फासारखी गोठलेली असते.