आसाममध्ये चकमक; आठ दहशतवादी ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:02 AM2021-05-24T06:02:19+5:302021-05-24T06:02:50+5:30
Encounter in Assam: नागालँड राज्याच्या सीमेलगत असलेल्या कारबी-अंगलाँग जिल्ह्यात धनसिरी येथे ही घटना घडली. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
गुवाहाटी : आसाममध्ये सुरक्षा दलाबरोबर रविवारी झालेल्या चकमकीत दिमसा नॅशनल लिबरेशन आर्मी (डीएनएलए) या संघटनेचे आठ दहशतवादी ठार झाले. नागालँड राज्याच्या सीमेलगत असलेल्या कारबी-अंगलाँग जिल्ह्यात धनसिरी येथे ही घटना घडली. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
ही मोहीम कारबी अंगलाँगचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली. आसाम रायफलचे जवानही या मोहिमेत सहभागी झाले होते. या चकमकीत ठार दहशतवाद्यांच्या नावांचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. (वृत्तसंस्था)
सक्रिय कुठे?
डीएनएलए ही दहशतवादी संघटना आसाममध्ये दिमा हासाओ व कारबी अंगलाँग हे भाग तसेच नागालँडमध्ये सक्रिय आहे. हे दहशतवादी या परिसरात असल्याची पक्की माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.
स्वतंत्र राष्ट्र हेच उद्दिष्ट
दिमसा जमातीकरिता स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या हेतूने डीएनएलए या संघटनेची दोन वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली होती. नैसोदाओ दिमसा हे या संघटनेचे अध्यक्ष व खारमिंडाओ दिमसा हे सचिव आहेत. ही संघटना फुटीरतावादी आहे.