झारखंडमधील चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 10:26 AM2019-06-02T10:26:59+5:302019-06-02T14:20:44+5:30
झारखंडमधील डुमका येथे रविवारी (2 जून) सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.
दुमका - झारखंडमधील डुमका येथे रविवारी (2 जून) सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तर यामध्ये एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील डुमका येथे चकमक झाली. रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ ही चकमक झाली. चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यावेळी चार जवान जखमी झाले तर एक जवान शहीद झाला. नक्षलवाद्यांशी लढताना गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर इतर तीन जवानांवर दुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात 15 ते 20 नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
Superintendent of Police, Y S Ramesh : In an encounter with Naxals in Dumka, 1 jawan has lost his life and 4 others are injured. According to our information 4-5 Naxals have been shot. #Jharkhandpic.twitter.com/f5yjENH6zH
— ANI (@ANI) June 2, 2019
आंध्र प्रदेशातील कोरापूरच्या पडुवा जंगलात काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. चकमकीदरम्यान सुरक्षा रक्षकांनी नक्षवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त केली होती. आंध्र प्रदेशच्या सीमेवर कोरापूरजवळील जंगलात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा रक्षकांनी जंगल परिसरात घेराव घातला. यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर देत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच, नक्षलवाद्यांनी आपल्या कमांडरना वाचविण्यासाठी सगल सहा आयईडी स्फोट केले होते.
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. दंतेवाडात जिल्हा राखीव सैनिक (डीआरजी) व विशेष कृती दलाच्या जवानांनी गोंदरस जंगलात ही संयुक्त कारवाई केली. अरनपूरजवळ असलेल्या गोंदरसच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पहिल्यांदाच महिला कमांडो सहभागी झाल्या होत्या. घटनास्थळावरून एक रायफल, 12 बंदुकांसह मोठ्या प्रमाणात दारू गोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.
याशिवाय, छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली होती. छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला होता. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते.