जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 09:43 AM2024-07-27T09:43:12+5:302024-07-27T09:44:12+5:30
आठ पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने ही शोध मोहीम सुरू केली होती. या कारवाईत लष्कराचे ५ जवान जखमी झाले.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये भारतीय लष्कराने शनिवारी पाकिस्तानी लष्कराचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. माछिल सेक्टरच्या वर्किंग एरियामध्ये एलओसीजवळ लष्कराने एका घुसखोराचा खात्मा केला. पाकिस्तानी लष्कराची बॉर्डर ॲक्शन टीम दहशतवाद्यांच्या एका गटाला भारतीय हद्दीत घुसण्यासाठी मदत करत होती. शनिवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांचा दहशतवाद्यांशी सामना झाला, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.
आठ पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने ही शोध मोहीम सुरू केली होती. या कारवाईत लष्कराचे पाच जवान जखमी झाले. काही दहशतवादी जंगलात पळून गेल्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू आहे. या भागात लष्कराचे आणखी जवान पाठवण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात सुमारे ४० ते ५० पाकिस्तानी दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे.
J&K | Macchal encounter: Five Indian Army soldiers including a Major rank officer suffered injuries in the encounter. All five troops were evacuated from the location. One of the injured soldiers has lost his life due to injuries: Defence officials pic.twitter.com/8Yf8hXr0lA
— ANI (@ANI) July 27, 2024
या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणावर दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली आहे. सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी झालेले दहशतवाद्यांकडे नाईट व्हिजन उपकरणं आणि अमेरिकन बनावटीच्या M4 कार्बाइन रायफल्ससह आधुनिक शस्त्रं आहेत.
यापूर्वी २४ जुलै रोजी कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून एक जवान जखमी झाला आहे. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी २५ जुलै रोजी उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील ठिकाणांना भेट दिली होती. त्यांनी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.