शोपियाँ येथील चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध गवई यांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2017 11:21 AM2017-08-13T11:21:46+5:302017-08-13T13:34:02+5:30
श्रीनगर, दि. 13 - जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये कालपासून सुरू असलेल्या चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध वामन गवई यांना वीरमरण आले आहे. गवई हे अकोला जिल्ह्यातील लोणाग्रा गावचे सुपुत्र होते. या चकमकीमध्ये गवई यांच्यासह अन्य एका जवानाला वीरमरण आले आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीदरम्यान लष्कराने एका दहशतवाद्यालाही ठार मारले आहे.
सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. एक ऑगस्ट रोजीच त्यांचा वाढदिवस होता. लवकरच ते सुटीवर गावी येणार होते, असे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियन जिल्ह्यातील अवनीरा गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, लष्काराच्या जवानांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु आहे. तर, दुसरीकडे कुपवाडा परिसरात सुद्धा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जखमी झाला आहे.
J&K: Sepoy Ilayaraja P and Sepoy Gowai Sumedh Waman - the two soldiers who lost their lives in the encounter in Shopian pic.twitter.com/LRzIFpXkWb
— ANI (@ANI) August 13, 2017
पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद...
नियंत्रण रेषेवरील पूंछ क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात नायब सुभेदार जगरामसिंग तोमर (42) हे शहीद झाले. ते मध्यप्रदेशच्या मोरेना जिल्ह्यातील तारसाना गावचा रहिवासी आहेत. त्यांच्या मागे पत्नी उमावती देवी, मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या पाच दिवसांत सीमेवर धारातीर्थी पडलेले ते दुसरे जवान आहेत.