अवंतीपोरा येथे चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 08:36 AM2019-10-08T08:36:27+5:302019-10-08T08:36:53+5:30
काश्मीरमधील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.
श्रीनगर - काश्मीरमधील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. अवंतीपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने परिसराला घेराव घातला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
Kashmir Zone Police: Encounter took place at the outskirts of Awantipora town. One terrorist killed. Arms and ammunition recovered. Identity and affiliation being ascertained. Search continues. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) October 8, 2019
दरम्यान, हिवाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने नवे कारस्थान आखल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी घडवण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. मात्र सिंधू खोऱ्यातील गुरेज विभागातून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे. या भागातून जवळपास सहा वर्षांनंतर घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे.
लष्करामधील सूत्रांनी सांगितले की, घुसखोरीची ही घटना 27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी घडली. गेल्या काही वर्षांपासून सिंधू खोऱ्याचा भाग बऱ्यापैकी शांत आहे. येथे दहशतवादाविरोधातील शेवटची मोहीम 2013 मध्ये चालवण्यात आली होती. दरम्यान, ''नियंत्रण रेषेच्या प्रत्येक बाजूने दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यामुळे खोऱ्यातील लोक दहशतीच्या छायेत आहेत.
दरम्यान, ग्रेनेड लाँचरसह दोन दहशतवाद्यांनी या भागात केलेली घुसखोरी ही चिंतेची बाब आहे, असे लष्कराचे म्हणले आहे. या परिसरात भटक्या समुदायाची वस्ती आहे. येथील रहिवासी अक्रोड आणि अन्य नैसर्गिक साधनसंत्तीच्या देवाणघेवाणीतून आपला उदरनिर्वाह करतात. सध्या गांदरबल आणि कारगिल येथून आखाती देशात राहणाऱ्या एका व्यक्तीला करण्यात आलेल्या फोन कॉलबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाच्या मृतदेहावर एका कुटुंबाने दावा केला आहे.