श्रीनगरः इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 11:03 AM2018-02-12T11:03:09+5:302018-02-12T13:05:08+5:30
जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाहीत, तोच दहशतवाद्यांनी आज पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला.
श्रीनगरः जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाहीत, तोच दहशतवाद्यांनी आज पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यानंतर, तिथून पळ काढणारे दहशतवादी कॅम्पजवळच्याच इमारतीत लपले असून त्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्कराने इमारतीला वेढा घातला असून ते दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण, श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जवानांचं काम आणखी कठीण झालंय.
Jammu & Kashmir: One CRPF personnel who was seriously injured in gunfight during ongoing encounter at CRPF camp in Srinagar's Karan Nagar succumbs to injuries. pic.twitter.com/UDEdAD5uDt
— ANI (@ANI) February 12, 2018
पहाटे साडेचारच्या सुमारास दोन दहशतवाद्यांनी करणनगर भागातील सीआरपीएफ 23 बटालियनच्या कॅम्पमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे एके-47 रायफलसह बराच मोठा शस्त्रसाठा होता. त्यामुळे मोठा घातपात करण्याच्या इराद्यानेच ते तिथे पोहोचले होते. परंतु, जवानांनी प्रसंगावधान राखत गोळीबार केला आणि दहशतवादी पसार झाले. कॅम्पजवळच एका इमारतीत लपून त्यांनी गोळीबार सुरू केलाय. गेले सहा-सात तास त्यांची जवानांसोबत चकमक सुरू आहे. त्यात एका जवानाला प्राण गमवावे लागलेत.
तत्पूर्वी, शनिवारी पहाटे जम्मूतील सुंजवां लष्करी तळावर लष्कराच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. लष्कराच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं, पण दोन अतिरेकी परिसरातच लपल्याचा संशय होता. त्यांना शोधण्यासाठी लष्करानं शोध मोहीम हाती घेतली होती. हा हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केल्याचं उघड झालं होतं.
दरम्यान, सुंजवां येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. त्यात गृहसचिव, गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख, रॉचे प्रमुख आणि अन्य अधिकारी सहभागी होणार आहेत.