दहशतवाद्यांशी चकमक, सीआरपीएफ निरीक्षक शहीद, शोधमोहीम युद्धस्तरावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 07:02 IST2024-08-20T06:03:09+5:302024-08-20T07:02:25+5:30
गेल्या काही कालावधीपासून बऱ्यापैकी शांत असलेल्या भागात हा हल्ला झाला आहे.

file photo
उधमपूर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) निरीक्षक कुलदीप शहीद झाले. या भागात काही दहशतवादी लपले असून सुरक्षा दलांची त्यांच्यासोबत चकमक सुरू आहे. गेल्या काही कालावधीपासून बऱ्यापैकी शांत असलेल्या भागात हा हल्ला झाला आहे.
सोमवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास बसंतगडमधील डुड्डू भागान सीआरपीएफ आणि जम्मू- काश्मीर पोलिसांचे संयुक्त विशेष मोहीम पथक गस्तीवर होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यात कुलदीप यांना गोळी लागली. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.
दहशतवादी पळाले
संयुक्त पथकाने प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. त्यांना हुडकून काढण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.