काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 11:05 AM2024-09-28T11:05:56+5:302024-09-28T11:18:43+5:30
काश्मीरच्या कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
काश्मीरच्या कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोशल मीडियावर माहिती देताना सैन्याने सांगितलं की, "गुप्त माहितीच्या आधारे, आज भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीरच्या अरिगाम, कुलगाममध्ये संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आलं. सर्च ऑपरेशन दरम्यान, दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला."
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगामच्या आदिगाम देवसर भागात चकमक सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि सुरक्षा दल उपस्थित आहे. अधिक माहिती लवकरच शेअर केली जाईल. याच दरम्यान, दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले आहे.
#Encounter has started at Adigam Devsar area of #Kulgam. Police and security forces are on the job. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) September 28, 2024
या कारवाईत लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचाही सहभाग आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी सतत अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी खोऱ्यात सतत शोधमोहीम राबवली जात आहे.
६ दहशतवाद्यांना करण्यात आली अटक
शुक्रवारी पोलिसांनी पुलवामाच्या अवंतीपोरामध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या ६ दहशतवादी साथीदारांना अटक केली आहे. ते तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत असत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ आयईडी, ३० डेटोनेटर, आयईडीच्या १७ बॅटरी, २ पिस्तूल, ३ मॅगझिन, २५ राउंड, ४ हँड ग्रेनेड आणि २० हजार रुपये जप्त केले आहेत. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.