शेवटी ती आईच... अपहरणकर्त्यांपासून केली 4 वर्षीय चिमुकलीची सुटका, CCTV त कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 11:03 PM2020-07-22T23:03:15+5:302020-07-22T23:04:04+5:30
पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक काळ्या रंगाची पल्सर गाडी दिसत असून त्यावर दोन व्यक्ती हेल्मेट परिधान करुन बसल्या आहेत.
नवी दिल्ली - पूर्व दिल्लीच्या शकरपूर परिसरातील एका 4 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाची केस दिल्ली पोलिसांनी सोडवली आहे. याप्रकरणी चिमुकलीचे काका आणि त्याच्या एका साथीदारास दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तरीही अद्याप सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इतर दोन अपहरणकर्त्यांचा शोध अद्यापही सुरुच आहे. 21 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता अपहरणाची ही घटना घडली होती. त्यावेळी, या चिमुकलीच्या आईने शर्थीचे प्रयत्न करत आपल्या मुलीला वाचवले.
पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक काळ्या रंगाची पल्सर गाडी दिसत असून त्यावर दोन व्यक्ती हेल्मेट परिधान करुन बसल्या आहेत. तर, एका घराबाहेर इतर दोघे फिरताना दिसून येत आहे. या गाडीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती लाल रंगाची बॅग काढून ती उघडी ठेवतो. त्यानंतर, शेजारील घराचा दरवाजा वाजवून पाणी देण्याची विनंती करतो. त्यावेळी घरातील एक महिला पाणी घेऊन येते, ते पाणी बाहेर उभा असलेल्या व्यक्तीच्या बाटलीत टाकले जाते. त्यानंतर, ती महिला घरात जाताच, महिलेच्या घरातील 4 वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न चौघांकडून करण्यात येतो. मात्र, मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आई धावत येऊन आपल्या मुलीला पूर्ण ताकदीने ओढून घेते.
@DelhiPolice@ndtvindia
— Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर (@mukeshmukeshs) July 22, 2020
पूर्वी दिल्ली के शकरपुर इलाके में एक 4 साल की बच्ची के अपहरण की कोशिश,लेकिन काफी बच्ची की मां की दिलेरी के सामने नाकाम हुए अपहरणकर्ता,पड़ोसियों ने पीछा किया लेकिन अपहरणकर्ता भागने में कामयाब रहे pic.twitter.com/m1CTJuE6Ew
आई आणि अपरहरणकर्त्यांच्या या झटापटीत दुचाकीस्वार खाली पडतो. त्यावेळी बाईकवरील दुसरा व्यक्ती समोरच्या दिशने पळू लागतो. त्यातच, संबंधित महिला केवळ आपल्या मुलीलाच वाचवत नसून त्या दुचाकीच्या एका चाकालाही पकडून ठवते. त्यामुळे गाडी पुढे नेण्यास अडचण होते, मात्र, अखेर अपहरकर्ता ती दुचाकी घेऊन धूम ठोकतो. त्यावेळी, शेजारील काही व्यक्तीही या दुचाकीस्वाराला पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हुलकावणी देत ते पळून जातात.
पड़ोसियों ने पकड़ने की खूब कोशिश की https://t.co/SNF1nYLXgZpic.twitter.com/DX8GlZI0UC
— Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर (@mukeshmukeshs) July 22, 2020
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी घटनास्थळावरुन काळ्या रंगाची दुचाकी, एक देशी कट्टा आणि चार काडतूस जप्त केले आहेत. त्यानंतर, दुचाकीच्या मालकास ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर खळबळजनक खुलासा समोर आला आहे. या चिमुकलीच्या सख्या काकाने म्हणजेच उपेंद्र उर्फ बिट्टूने ही अपहरणाची प्लॅनिंग आखली होती. पोलिसांनी उपेंद्रला अटक केली असून केवळ पैशाच्या लोभापायी आपण मुलीच्या अपहरणाचा प्लॅन आखल्याचे उपेंद्रने पोलिसांना सांगितले. सध्या, पैशाची मोठी अडचण उपेंद्रला होती, तर त्याच्या भावाचा उद्योग जोरात सुरू असल्याने 30-35 लाख रुपये मिळविण्याच्या हेतून हा डाव आखल्याचंही उपेंद्रने पोलिसांपुढे कबुल केले.