लॉकडाऊन संपताच शहरांमधील बेरोजगारीचा दर होऊ लागला कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:50 PM2021-09-11T12:50:48+5:302021-09-11T12:52:02+5:30
सरकारची माहिती : यापूर्वी होते खासगी संस्थांचे सर्वेक्षण
नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२०-२१च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर - डिसेंबर २०२० या कालावधीत शहरांतील बेरोजगारीचा दर आदल्या तिमाहीच्या तुलनेत घटून १०.३ टक्के झाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
एनएसओने दीर्घ काळापासून बेरोजगारीची आकडेवारी जारी केलेली नव्हती. या आकडेवारीसाठी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीसारख्या (सीएमआयई) खासगी संस्थांवर अवलंबून राहावे लागत होते. या अहवालासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या काळात अखिल भारतीय पातळीवर एकूण ५,५६३ यूएफएस ब्लॉकमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.
एनएसओच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२०ला संपलेल्या तिमाहीत भारतातील बेरोजगारीचा दर १०.३ टक्के राहिला. त्याआधीच्या जुलै - सप्टेंबर २०२० या तिमाहीत तो १३.२ टक्के होता. आदल्या वर्षाच्या तुलनेत मात्र बेरोजगारीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर २०१९ला संपलेल्या तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर एकअंकी ७.८ टक्के होता. अहवालात म्हटले आहे की, डिसेंबर २०२०च्या तिमाहीत शहरांतील सर्व वयोगटातील लोकांचा श्रमशक्ती सहभागिता दर ३७.३ टक्के राहिला. आदल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो ३७.२ टक्के होता. तसेच जुलै-सप्टेंबर २०२०च्या तिमाहीत तो ३७ टक्के होता.
जून २०२०मध्ये सर्वाधिक बेरोजगारी
एनएसओने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वित्त वर्ष २०२० - २१च्या एप्रिल - जून तिमाहीत बेरोजगारी सर्वाधिक २०.८ टक्के होती. या काळात कोविड-१९ साथीमुळे देशभरात सक्तीचे लॉकडाऊन सुरू होते.