एनसीसीच्या मुलांकडे बंदोबस्त, लाठीचार्ज; बिहारमध्ये श्रावण सोमवारी चेंगराचेंगरी, ७ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 08:41 AM2024-08-12T08:41:12+5:302024-08-12T08:41:43+5:30
सोमवारच्या पहाटे मंदिरात मोठी गर्दी झाली होती. गर्दी एवढी जास्त होती की धक्काबुक्की होऊ लागली.
जहानाबाद : श्रावणातील सोमवारी बिहारच्या जहानाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मखदुमपूरच्या बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने सात जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत.
सोमवारच्या पहाटे मंदिरात मोठी गर्दी झाली होती. गर्दी एवढी जास्त होती की धक्काबुक्की होऊ लागली. यात एकमेकांवर पडून सात लोकांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जहानाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व मदतकार्य सुरु केले. श्रावण सोमवारी शिवमंदिरात खूप गर्दी होते. रविवारी रात्रीपासूनच हे लोक येण्यास सुरुवात झाली होती. बिहारमध्ये श्रावण महिन्यातील चौथा सोमवार होता. एसडीओ विकास कुमार म्हणाले की, रविवारी रात्री गर्दी खूप अधिक असते. चौथा सोमवार असल्याने आम्ही सतर्क होतो. वैद्यकीय टीमही तैनात केलेली होती. ही दुर्घटना कशी झाली त्यावर लवकरच अधिकृत वक्तव्य केले जाईल.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, प्रशासनाने लाठीचार्ज केला यामुळे चेंगराचेंगरी झाली. एनसीसीचे जवान तैनात करण्यात आले होते. बिहार पोलीस कुठेच दिसत नव्हते. तर अन्य एकाने सांगितले की, खाकी वर्दीतील लोकांशी गर्दीतील काही जणांची बाचाबाची झाली, यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे लोक घाबरले आणि मागे धावायला लागले यातून ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.