AAP नेते संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळ्याबाबत ED कडून आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 04:33 PM2023-12-02T16:33:07+5:302023-12-02T16:33:50+5:30
AAP Sanjay Singh: दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात पुढील आठवड्यात कोर्टात सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
AAP Sanjay Singh: दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना अटक करीत ईडीने सत्ताधारी आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा हादरा दिला. मनीष सिसोदिया यांच्या पाठोपाठ मद्य धोरण घोटाळ्यातील दुसरी सर्वात मोठी अटक ठरली. यानंतर आता संजय सिंह यांच्या अडचणी वाढू शकतात, असे म्हटले जात आहेत. याचे कारण म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय सिंह यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणातील कट रचणे, मनी लाँड्रिंग करणे आणि आरोपींना मदत करणे यामध्ये संजय सिंह सामील असल्याचा आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे. दिल्लीच्या एका न्यायालयात या घोटाळ्यासंदर्भातील पुढील सुनावणी ०४ डिसेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत हे आरोपपत्र सादर केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
आप नेते संजय सिंह यांच्यावर काय आरोप करण्यात आलेत?
ईडीने आपल्या आरोपपत्रात मद्य घोटाळ्यातील अन्य आरोपी दिनेश अरोरा याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा आरोप केला होता. या बैठकीला संजय सिंह उपस्थित होते. दिनेश अरोरा यांनी ईडीसमोर दिलेल्या कबुली जबाबानुसार, संजय सिंह यांची पहिल्यांदा एका कार्यक्रमात भेट झाली. यानंतर ते मनिष सिसोदिया यांच्या संपर्कात आले. दिल्ली निवडणुकीपूर्वी आप नेत्यांनी मिळून केलेला हा निधी उभारणीचा कार्यक्रम होता, असा मोठा आरोप करण्यात आला आहे.
दिनेश अरोरा यांचे एक प्रकरण संजय सिंह यांनी परस्पर मिटवले
ईडीच्या आरोपपत्रानुसार, संजय सिंह यांच्या सांगण्यावरून, दिनेश अरोरा यांनी दिल्लीतील निवडणुकांसाठी पक्ष निधी गोळा करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट मालकांशी चर्चा केली. एवढेच नाही तर ३२ लाखांचा धनादेशही मनिष सिसोदिया यांच्याकडे सुपूर्द केला. उत्पादन शुल्क विभागाकडे प्रलंबित असलेले दिनेश अरोरा यांचे एक प्रकरण संजय सिंह यांनी सोडवल्याचा आरोप ईडीने केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय सिंह यांच्या निवासस्थानावर छापे टाकले होते. यानंतर संजय सिंह यांना अटक करण्यात आली. याच प्रकरणात तपास यंत्रणांनी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली.